बारामती तालुक्याला पावसाने झोडपले | पुढारी

बारामती तालुक्याला पावसाने झोडपले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर आणि तालुक्यात गुरुवारी (दि. 28) मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री आठच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत शहर व तालुक्यात जोरदार पाऊस बरसत होता. तालुक्यात मोरगाव येथे सर्वाधिक 84 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी रात्रीही शहर व तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. गुरुवारी मात्र अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस बरसला. जिरायती भागात पावसाची अधिक गरज होती. त्या भागाला पावसाने चांगलाच दणका दिला. अचानक आलेल्या पावसाने उकाड्यापासून बारामतीकरांना दिलासा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह दोन ते तीन तास पाऊस झाला.

पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी उन्हाचा कडाका तीव्र होता. पावसामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साठले होते. ग्रामीण भागासह जिरायती भागातही पहिलाच पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पावसाचे पाणी मुरले गेले. पावसामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतीला दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यातील खरिपातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गुरुवारच्या पावसामुळे तरकारी पिकांना फायदा झाला असून उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बारामती शहर, जिरायती भागातील काही गावे, माळेगाव, पणदरे, वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर या परिसराला पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी कडवळ व मका जमीनदोस्त झालेले चित्र होते. तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद मोरगाव येथे 84 मिलिमीटर, मोढवे येथे 71 मिलिमीटर, तर मुर्टी येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामती शहरात 65, चांदगुडेवाडी येथे 59 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सुप्यासह जिरायती भागात सर्वत्र पावसाने हजेरी लावली.

पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे
उंडवडी क.प. 12, लोणी भापकर 57, वडगाव निंबाळकर 64, माळेगाव कॉलनी 21, पणदरे 2, लाटे 5, बर्‍हाणपूर 39, सोमेश्वरनगर 13, जळगाव कप 06 , होळ 39, माळेगाव कारखाना 04, मानाजीनगर 03, अंजनगाव 14, जळगाव सुपे 06, केव्हीके 29, सोनगाव 07, कटफळ 10, सायंबाचीवाडी 29, चौधरवाडी 35, कार्‍हाटी 7, गाडीखेल 12, पळशी 36.

Back to top button