पुणे आणि पिंपरी -चिंचवडसाठी दोनचाच प्रभाग? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार | पुढारी

पुणे आणि पिंपरी -चिंचवडसाठी दोनचाच प्रभाग? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रारुप प्रभाग करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तरीही पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेसाठी दोन सदस्यीय प्रभागच होणार असल्याचा दावा केला जात आहे.पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेसाठी दोन सदस्यीय प्रभागासंदर्भातील प्रस्ताव येणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील १८ महापालिकांसाठी एक सदस्यांचा प्रारुप (कच्चा) आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दिले. एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या राष्ट्रवादीची आग्रही भूमिका असतानाच आयोगाच्या एक प्रभागाच्या आदेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभागाच्‍या निर्णयामुळे चर्चांना उधाण

एकच प्रभाग राहिल्यास त्याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार याच्या आडाख्याबरोबरच ५० टक्के महिला आरक्षणामुळे कोणाचे राजकीय भवितव्य अडचणीत येणार यासंबधीच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने जरी एक सदस्यीय प्रारुप प्रभाग रचनेचे आदेश दिले असले तरी मुंबई वगळता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन सदस्यांचाच प्रभागाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.

याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत.

पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठक[त दोन सदस्यीय प्रभाग पध्दतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणून त्यावर शिक्कामोर्तब केला जाईल, असेही सांगण्यात आले.

सध्‍या ३१ डिसेंबर २०१९ च्या महाराष्ट्र महापालिका कायद्यातील सुधारणानुसार सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग लागू आहे.

या तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. मात्र, हा प्रभागांचा कच्चा आराखडा आहे.

दोन सदस्यीय प्रभागाचा निर्णय झाल्यानंतर एक सदस्यीय दोन प्रारुप प्रभाग एकमेकांना जोडून दोनचा प्रभाग रचना करता येणे शक्य आहे, अशी माहितीही वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

दरम्यान, पुणे पालिकेची प्रभाग रचना करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

त्यामुळे दोन सदस्यीय प्रभागाचा निर्णय घेण्यासाठी सरकारच्याही हातात अवधी असल्याचे स्पष्ट होत आहे.

दोनसाठी मुख्यमंत्रीही अनुकुल !

मुंबईसाठी एकचाच प्रभाग होणार आहे. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नवी मुंबई आणि औरगांबाद या महापालिकांमध्ये ही एक सदस्यीय प्रभाग हवा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसाठी दोनचा प्रभाग हवा आहे.

नवी मुंबई आणि औरगांबाद मध्ये दोन सदस्यांचा प्रभाग झाला तरी शिवसेनेला त्याचा फायदा होईल, असे काही सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

त्यामुळे मुंबई वगळता अन्य सर्वच महापालिका दोन सदस्यीय प्रभाग रचनेने निवडणूक घेण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शविली असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ : पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Back to top button