कोल्हापूर जिल्ह्याची ढोबळ एफआरपी ३,६३१ रुपये | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्याची ढोबळ एफआरपी ३,६३१ रुपये

कोल्हापूर/कुडित्रे; प्रा. एम. टी. शेलार : कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय अन्न मंत्रालयाने केंद्रीय कॅबिनेट समितीला उसाच्या एफ.आर.पी.मध्ये प्रतिटन 50 रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली होती. केंद्रीय कॅबिनेट समितीने ही शिफारस स्वीकारल्यामुळे आगामी हंगामात 10 टक्के बेसिक उतार्‍याला प्रतिटन 2900 रुपये (2850 रुपये जुना दर) व पुढील 1 टक्का उतार्‍यास 290 (285 ऐवजी) रुपयांप्रमाणे एफआरपी मिळेल. कोल्हापूर जिल्ह्याचा 2020- 21 च्या हंगामातील सरासरी साखर उतारा 12.52 टक्के आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 3,631 रुपये ढोबळ एफआरपी मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा 2020-21 हंगामातील सरासरी तोडणी-वाहतूक खर्च प्रतिटन 679 रुपये आहे. हा खर्च वजा जाता ऊस उत्पादकांना जिल्ह्यात प्रतिटन 2,950 रुपये एवढी एफ. आर. पी. म्हणजे पहिली उचल मिळणार आहे.

कुणाची किती ढोबळ एफ.आर.पी.?

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गेल्या हंगामातील सरासरी साखर उतारे विचारात घेतले, तर कारखानानिहाय ढोबळ एफआरपी पुढीलप्रमाणे असेल. कारखान्याचे नाव, उतारा टक्के व ढोबळ (ग्रॉस) एफ.आर.पी.रुपये पुढीलप्रमाणे — जवाहर (12.15/3,523), शरद-नरंदे (12.05/3,494), दत्त- शिरोळ (12.30/3,567), शाहू-कागल (12.80/3,712), गुरुदत्त-टाकळी (12.45/3,610), कुंभी-कासारी (12.69/3,680), दूधगंगा-बिद्री (12.72/3,688), पंचगंगा-इचलकरंजी (12.92/3,746), मंडलिक-हमिदवाडा (12.52/3,630),छ. राजाराम-क. बावडा (11.91 /3,453), सेनापती घोरपडे -कापशी (12.51/3,627), तात्यासाहेब कोरे-वारणा (12.65/ 3,668), भोगावती- परिते (12.31/3,569), डॉ. डी. वाय. पाटील (12.50/3,625), दालमिया-आसुर्ले पोर्ले (13.43/3,894).

सरासरी उतारे घटले

कारखानानिहाय ढोबळ व निव्वळ एफआरपी निश्चित करताना गेल्या हंगामातील सरासरी साखर उतारा व तोडणी-वाहतूक खर्च पायाभूत मानला जातो. कोल्हापूर जिल्ह्याचा 2020-21 हंगामातील सरासरी साखर उतारा 12.52 टक्के आहे. गेल्या 2019-20 हंगामात सरासरी साखर उतारा 12.48 टक्के होता. म्हणजे पण अनेक साखर कारखान्यांचे सरासरी साखर उतारे अर्धा ते एक टक्क्यांनी घटले आहेत. कारखान्यांचे गेल्या हंगामातील घटलेले सरासरी साखर उतारे आणि तोडणी-वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे ऊस उत्पादकांना गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन सुमारे 157 रुपयांनी एफआरपी कमी मिळणार आहे.

तोडणी-वाहतूक खर्चात 14 टक्के वाढ

जिल्ह्याचा 19-20 हंगामातील सरासरी तोडणी-वाहतूक खर्च प्रतिटन 638 रुपये 40 पैसे होता. ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान या तोडणी खर्चात 14 टक्के वाढ दिली आहे. मुकादम कमिशनसह तोडणीचा खर्च प्रतिटन 239 रुपये 60 पैशावरून प्रतिटन 273 रुपये 14 पैसे झाला आहे. म्हणजे प्रतिटन 41 रुपये 11 पैशांनी तोडणी खर्चात वाढ झाली आहे. ती एफआरपीतून वजा होणार आहे. शिवाय डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूकदार दरवाढ फरक मागण्याची शक्यता आहे.

गेल्या हंगामातील साखर कारखान्यांचा सरासरी तोडणी-वाहतूक खर्च उपलब्ध होत नसल्याने ढोबळ एफआरपी दिली आहे.

तोडणी-वाहतूक खर्चच कळीचा मुद्दा

साखर कारखानदार लांबचा 100 कि.मी. अंतरावरून ऊस आणतात आणि त्याचा बोजा जवळच्या ऊस उत्पादकांवर पडतो. गेल्या हंगामात सरासरी उतारे घटले आणि तोडणीचा खर्च 14 टक्क्यांनीवाढला. शिवाय शेतकर्‍यांना ऊस घालवण्यासाठी ‘खुशाली’च्या नावाखाली एकरी चार हजारांपेक्षा जादा खंडणी द्यावी लागली.

Back to top button