आरएच विसंगती (RH discrepancy) म्हणजे काय? | पुढारी

आरएच विसंगती (RH discrepancy) म्हणजे काय?

डॉ. रिषमा पै

रक्तगटांचे ए, बी, एबी आणि ओ हे चार प्रमुख प्रकार आहेत हे सर्वांना माहीत आहेच. व्यक्तीमधील जनुकांनुसार निश्चित होणारा रक्तगट आई-वडिलांकडून अनुवंशिकतेने येतो. शिवाय यात आरएच फॅक्टर नावाचे एक प्रथिन असते. आरएच पॉझिटिव्ह (+) व्यक्तींमध्ये हे प्रथिन असते, तर आरएच निगेटिव्ह (-) व्यक्तींमध्ये हे प्रथिन नसते. त्यानुसार रक्तगटांचे 8 प्रकार होतात. (RH discrepancy)

आरएच विसंगती (RH discrepancy) म्हणजे काय?

आरएच किंवा ‘र्‍हिसस’ फॅक्टर हे एक अनुवंशिकतेने येणारे प्रथिन आहे आणि लाल रक्तपेशींवरील पेशींच्या पडद्याच्या पृष्ठभागावर ते आढळते. तुमच्या रक्तामध्ये हे प्रथिन असेल तर तुम्ही आरएच पॉझिटिव्ह असता आणि ते नसेल तर आरएच निगेटिव्ह असता. अर्थात रक्तामध्ये आरएच असणे ही एक सामान्य अवस्था आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीला कोणता आजार आहे असा होत नाही किंवा याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

अर्थात गरोदर स्त्री आरएच निगेटिव्ह असेल तर गरोदरपणात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरएच-निगेटिव्ह रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: तिच्या पोटातील बाळाचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असेल तर आणखी काळजी घ्यावी लागते. कारण, या स्थितीला आरएच कम्पॅटिबिलिटी किंवा विसंगती (RH discrepancy) असे म्हणतात. याचा मातेच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही; पण तिच्या पोटातील बाळावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तिच्या आरएच निगेटिव्ह रक्तगटाची विशेष काळजी घ्यावी लागते.

आईच्या शरीराची तिच्या बाळाच्या आरएच पॉझिटिव्ह रक्ताशी आंतरक्रिया होऊन अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होतात, तेव्हा आरएच विसंगती निर्माण होते. विशेषत: याच स्त्रीच्या दुसर्‍या गरोदरपणात बाळ आरएच पॉझिटिव्ह असेल, तर तत्काळ अँटिबॉडीज तयार होतात. आरएच पॉझिटिव्ह बाळाची वार ओलांडून या अँटिबॉडीज गेल्या की, त्याच्या लाल रक्तपेशींचे नुकसान होते.

लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन प्रवाहित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतात. अशा परिस्थितीत लाल रक्तपेशींचे वेगाने नुकसान झाल्याने अ‍ॅनिमियासारखी अवस्था निर्माण होऊन बाळासाठी प्राणघातक ठरू शकते. नवीन लाल रक्तपेशी निर्माण करण्याची बाळाच्या शरीराची क्षमता कमी झाल्यास कठीण होते. यातून कावीळ, हार्ट फेल्युअर, यकृताचे काम मंदावणे आदी अवस्था येतात आणि बाळासाठी हे प्राणघातक ठरू शकते.

गरोदर स्त्रीची इनडायरेक्ट कुम्ब्स चाचणी ही साधी रक्तचाचणी करून या अवस्थेचे निदान करता येते. रक्तामध्ये पेशी नष्ट करणार्‍या अँटिबॉडीज आहेत की नाही, याचे निदान या चाचणीद्वारे करता येते आणि डॉक्टर यावर काय करायचे, त्याबद्दल सल्ला देऊ शकतात. बाळाची आई आरएच निगेटिव्ह असेल आणि बाबा आरएच पॉझिटिव्ह असेल तर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन आईला देऊन तिच्या शरीरात आरएच अँटिबॉडीज तयार होणे रोखता येते. गरोदरपणाच्या 28 आठवड्यांपर्यंत हे इंजेक्शन दिले जाऊ शकते आणि बाळाचा रक्तगट पॉझिटव्ह असेल तर प्रसूतीनंतरही देता येते. या उपायांनी बाळाचे प्रभावीरीत्या संरक्षण होऊ शकते.

Back to top button