पुणे : कपर्दिकेश्वर मंदिरात वीरगळीचे जतन | पुढारी

पुणे : कपर्दिकेश्वर मंदिरात वीरगळीचे जतन

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील पुरातन कपर्दिकेश्वराच्या मंदिरात सध्या मंदिर परिसरात विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ती करताना काही पुरातन शिल्पे आढळून आली आहेत. दगड व शिळेवर कोरलेल्या शिल्पांचे व्यवस्थित जतन करण्यात आल्याची माहिती रमेश डुंबरे पाटील यांनी दिली. ही शिल्पे शिलाहार किंवा चालुक्य राजाच्या कालखंडातील असावीत, असा अंदाज आहे.

येथे पुरातन, नवसाला पावणारे स्वयंभू शिवलिंग आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. यात्रेत कुस्त्यांचे आखाडे भरविले जातात तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या शिल्पात मंदिराचे जुने दोन कळस, कलशदर्शन स्तंभ व वीरगळ शिल्पे मिळून आली आहेत. या शिल्पावरून ओतूर गावचा शेकडो वर्षांच्या इतिहासाचा उलगडा होतो.

ओतूर गाव हे शूरवीरांचे गाव म्हणून परिचित आहे. गावाला तीन वेशी असून, आजही या वेशी इतिहासाची साक्ष देतात. पूर्वी गावाला तीनही बाजूला भक्कम तटबंदी होती. पुरातन गढी होती. तटबंदी आज जमीनदोस्त झाली आहे. वेशींचा जीर्णोद्धार केल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे. मंदिर परिसरातील विकासकामे करताना सापडलेली वीरगळ व दगडी दर्शन कलश महत्त्वपूर्ण असल्याने त्यांचे जतन करण्यात आले आहे.

मिळालेली शिल्पे ही शिलाहार अगर चालुक्य काळातील असावीत. शिलाहार राजा कुपद्री 1 व 2 हे सातव्या शतकातील राजे असावेत, असे डुंबरे यांनी सांगितले. वीरगळ हे इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. युद्धभूमीवर वीरमरण येणे हे पुण्यप्रद मानले जाते. कोणत्याही युद्धात वीरगती प्राप्त झाल्यास पूर्वी त्या वीराचे स्मारक वीरगळच्या स्वरूपात उभारले जात असे.

वीरगळ कसे ओळखावे?

याबाबत डुंबरे म्हणाले की, साधारणपणे अडीच ते तीन फूट उंचीच्या पाषाणावर किंवा शिळेवर एकावर एक असे तीन चौकोन किंवा चार चौकोन कोरून त्यावर वीरांची कथा कोरलेली असते. एकदम खाली तो वीर मृत्युमुखी पडला, असे दाखविलेले असते. त्याच्यावर त्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत, असेही कोरलेले असते. वरील चौकोनात तो वीर शिवमय झाला, हे दाखविण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना कोरलेले असते. या शिल्पात सर्वात वर सूर्य, चंद्र कोरलेले असतात.

Back to top button