परतीच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन | पुढारी

परतीच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंढरपूरच्या आषाढी यात्रेनंतर परतीच्या मार्गावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या गुरुवारी (दि. 21) पुण्यात दाखल होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी येणार आहे. या पालख्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार असून, शनिवारी (दि. 23) या पालख्या मार्गस्थ होणार आहेत. पंढरपूला आषाढी यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. त्यानंतर या पालख्या आता परतीच्या मार्गावर असून, गुरुवारी त्या शहरात येणार आहेत.

यानिमित्त दोन्ही पालख्यांचा मुक्काम असलेल्या मंदिरांमध्ये खास तयारी केली असून, धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले, “क्षेत्र पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी सकाळी सहा वाजता भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे येणार आहे. तसेच 21 आणि 22 जुलै या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता पालखी श्री क्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ होणार आहे.

यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक उपक्रम आयोजित केले आहेत. भाविकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.” ‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नवी पेठ विठ्ठल मंदिरामध्ये आगमन होणार असून, 21 आणि 22 जुलै रोजी मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे. त्यानिमित्त रात्री कीर्तन आणि जागर होईल. शनिवारी सकाळी सात वाजता पालखी श्रीक्षेत्र देहूकडे प्रस्थान करणार आहे. तरी, भाविकांनी दर्शनाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन संजय गाडे यांनी केले आहे.

Back to top button