पिंपरी : बूस्टर डोस घेण्यात ज्येष्ठ आघाडीवर | पुढारी

पिंपरी : बूस्टर डोस घेण्यात ज्येष्ठ आघाडीवर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 1 लाख 29 हजार 506 नागरिकांनी आत्तापर्यंत कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यामध्ये सर्वाधिक बूस्टर डोस ज्येष्ठांनी घेतला आहे. 60 वर्षावरील 59 हजार 491 ज्येष्ठ नागरिकांनी आत्तापर्यंत बूस्टर डोस घेतला आहे. त्या तुलनेत 22 हजार 355 हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्करने बूस्टर डोस घेतला आहे.

महापालिकेकडून यापूर्वी 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक, हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर यांना मोफत बूस्टर डोस दिला जात होता. मात्र, केंद्र सरकारच्या सुचनेनुसार आता 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाही महापालिकेच्या 8 कद्रांवर हा बूस्टर डोस मोफत देण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. त्यानुसार शुक्रवारी (दि.15) दिवसभरात 18 वयोगटापासून पुढील वयोगटाच्या 380 नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला. त्यामध्ये 18 ते 59 वयोगटातील 335 नागरिकांचा समावेश होता.

कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याच्या सहा महिन्यानंतर शरीरातील अँटिबॉडीजचे प्रमाण कमी होत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) पाहणीत दिसून आले आहे. बूस्टर डोस देण्यात आला तर रोगप्रतिकारशक्ती वाढते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी 75 दिवसांची विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे.

आजअखेर 18 ते 59 वयोगटातील 32 लाख 24 हजार 756 नागरिकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे. तर, या वयोगटातील 47 हजार 660 नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्करच्या लसीकरणाचे प्रमाण दीड लाखांपेक्षा आधिक आहे. 1 लाख 53 हजार 649 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पहिला व दुसरा डोस समाविष्ट आहे. 22 हजार 355 हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्करने बूस्टर डोस घेतला आहे. 60 वर्षावरील 59 हजार 491 ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत बूस्टर डोस देण्यात आला आहे.

बूस्टर डोस कोणाला घेता येतो ?
कोरोना लसीच्या दुसर्‍या डोसनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण करणार्‍या 18 वर्ष वयोगटापुढील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येतो. महापालिकेच्या 8 लसीकरण केंद्रांवर हा डोस उपलब्ध आहे. त्यासाठी केंद्रीय किऑस्क टोकन प्रणाली किंवा कोविन अ‍ॅपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करण्याची गरज नाही. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येत आहे.

Back to top button