पुणे : तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर अपघातात वाढ | पुढारी

पुणे : तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर अपघातात वाढ

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा : ढमढेरे-न्हावरे रस्त्याची काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती, त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, नुकतेच रस्त्याचे नव्याने काम झाल्याने रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने जात आहेत. परिणामी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) फाट्याजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. सोन्याबापू बाळू चोरमले (रा. टाकळी भीमा, ता. दौंड) व अशोक शिंदे (सध्या रा. कासारी, गणपतीमाळ, ता. शिरूर) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वीही अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. मागील पंधरा दिवसांत 7 अपघात झाले आहेत.

वाहनचालकांच्या भरधाव वाहन चालवण्याने अनेक वेळा भीषण अपघात घडतात, जीवितहानीही झाली आहे. रस्त्याच्या कडेला अनेक छोटी, मोठी गावे व वाड्या-वस्त्या आहेत. शिवतक्रार म्हाळुंगी, सातकरवाडी, दहिवडी, तोडकरवस्ती, माळवाडी, घोलपवाडी, ढमढेरेवस्ती व न्हावरे याठिकाणी गतिरोधक बसण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने निमगाव म्हाळुंगी फाटा, करपेवस्ती, घोलपवाडी या ठिकाणी गतिरोधक बसवून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी मनसे नेते रवींद्र चौधरी व अर्जुन घोलप, बबन झोले, दत्तात्रय वडघुले, सतीश भोसले, पुरुषोत्तम घोलप यांनी केली आहे.

Back to top button