जैव-इंधनावर धावणार शंभर पीएमपी; बाणेर येथील प्रकल्पाची क्षमता वाढणार | पुढारी

जैव-इंधनावर धावणार शंभर पीएमपी; बाणेर येथील प्रकल्पाची क्षमता वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ओल्या कचर्‍यापासून तयार केल्या जाणार्‍या ‘जैव-इंधना’वर (क्रॉम्प्रेस बायोगॅस-सीबीजी) किमान शंभर पीएमपीएमएल बस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यासाठी लवकरच बाणेर येथील सूस रस्त्यावरील जैव-इंधन प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून ‘सिटी वेस्ट, टू सिटी बस’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या सहकार्याने बाणेर येथील सूस रोड परिसरात ओल्या कचर्‍यापासून जैव-इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पात सध्या दररोज 150 ते 160 मेट्रिक टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून 4 हजार किलो जैव-इंधन तयार केले जाते. यापैकी 3000 किलो जैव-इंधन इतर कंपन्यांना, तर 1 हजार किलो जैव-इंधन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससाठी वापरले जाते. सध्या पीएमपीएमएलच्या 10 ते 15 बस जैव-इंधनावर धावतात. या बसचे लोकार्पण नुकतेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाले. एका बसला प्रतिदिन 75 ते 80 किलो जैव-इंधन खर्ची पडते. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 200 मेट्रिक टन वाढविण्यात येणार आहे. यातून किमान 100 पीएमपीएमएल बस जैव-इंधनावर धावतील. बसची ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख, उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

शहरात जिरवला जाणारा कचरा
सध्या शहर व समाविष्ट गावांमधून 2200 मे. टन कचरा संकलित होतो.
संकलित होणार्‍या कचर्‍यात 900 मे. टन ओला कचरा असतो.

शहरातील सोसायट्यांमध्ये
75 मेट्रिक टन ओला कचरा जिरवला जातो.
घरगुती स्वरूपाच्या कंपोस्ट प्रकल्पामध्ये 75 मे. टन ओला कचरा जिरवला जातो.
महापालिकेने प्रत्येकी 5 मे. टन क्षमतेचे 25 बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत.
सध्या 12 बायोगॅस प्रकल्प सुरू असून, 13 बंद आहेत.
या प्रकल्पांमध्ये 300 घनमीटर बायोगॅस तयार केला जातो.

जैव-इंधनाचा वापर बसची संख्या आणि बाणेर येथील प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे, असे असले तरी मोठ्या सोसायट्यांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा सोसायटीतच जिरविण्याची सक्ती कायम राहणार आहे. वाहतूक व्यवस्था आणि मनुष्यबळाचा विचार करता सोसायट्यांना कोणतीही सूट मिळणार नाही.

              – आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.

Back to top button