पिंपरी : भुशी धरणात मुंबईचा पर्यटक बुडाला | पुढारी

पिंपरी : भुशी धरणात मुंबईचा पर्यटक बुडाला

लोणावळा : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेला एक तरुण येथील भुशी धरणात बुडाल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारच्या सुमारास घडली आहे. साहिल सरोज (वय 19, रा. मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार 250 जणांचा एक ग्रुप लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आला होता. त्यात साहिल याचा समावेश होता. भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याखाली हे सर्व पाण्यात भिजण्याचा आंनद घेत असताना साहिल पाय घसरुन पडला व वाहून भुशी धरणात गेला. सध्या त्याचा शोध सुरू असून लोणावळा शहर पोलिस व शिवदुर्ग रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सोमवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी आणि त्यातून वाढलेला अपघाताचा धोका लक्षात घेत लोणावळा नगर परिषद तसेच पोलिसांकडून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, या संदर्भातील सूचनाफलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या मालकीचे असणारे हे धरण मागील अनेक वर्षांपासून लोणावळ्यातील पर्यटनाचे प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहे.

दरवर्षी साधारण जूनअखेरी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे धरण 100 टक्के भरते. पावसाळ्यात हे धरण कधी एकदा पूर्ण भरते आणि त्यातील पाणी येथील पायर्‍यांवरून वाहू लागते याची वाट पर्यटक मोठ्या आतुरतेने बघत असतात; पण एकदा का हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहायला लागले की याठिकाणी पर्यटकांची जत्रा भरते. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असताना पाण्यात उतरण्याचा पराक्रम करणे अनेकदा नागरिकांच्या जीवावर बेतते.

विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा अपघात
मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात फिरायला आलेला एक पर्यटक अपघातात जखमी झाला आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र बचाव पथकातील सदस्य व ग्रामस्थांंनी विसापूर किल्ल्याकडे जात जखमी युवकाला जंगलातून रेस्क्यू करत बाहेर काढले. यश मेहता असे या युवकाचे नाव असून तो रायगड जिल्ह्यातील माणगावचा रहिवाशी आहे.

Back to top button