कोल्हापूर : प्रचार तोफा थंडावल्या | पुढारी

कोल्हापूर : प्रचार तोफा थंडावल्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात सुरू असणारी जाहीर प्रचाराची रणधुमाळी रविवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजता संपली. खुल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मंगळवार, दि. 7 रोजी मतदान होणार आहे. रविवारी रात्रीपासून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंकडून छुप्या प्रचारास सुरुवात झाली आहे.

केद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजकीय धुळवडीस सुरुवात झाली. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार चाचपणीपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती सुरू झाली. प्रचारापेक्षा उमेदवारीच्या जोडण्यांवर अधिक भर दिल्याने पहिल्या टप्प्यात सामान्य मतदारांपर्यंत निवडणूक पोहोचली नाही. मात्र महाविकास आघाडीने शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचारास सुरुवात झाली. 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रचारात रंग भरला.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत स्पष्ट झाल्याने दोन्ही बाजूकडून स्टार प्रचारकांच्या सभांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. स्थानिक नेत्यांसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन झाल्याने निवडणुकीत अधिक रंगत आली. जाहीर सभा, कॉर्नर सभा, रॅली, पदयात्रा अशा विविध पद्धतीने महायुती आणि महाविकास आघाडीसह स्वाभिमानी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडाला. महाविकास आघाडी आणि महायुतीने शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. विधानसभा मतदारसंघनिहाय सभा, मेळाव्यांच्या माध्यमातून नेत्यांनी मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.

महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नीलम गोर्‍हे यांच्यासह स्थानिक मंत्री, खासदार आमदारांसह अभिनेता गोविंदानेही हजेरी लावली. महाविकास आघाडीतर्फे उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे रमेश चेनीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुषमा अंधारे, आ. आदित्य ठाकरे यांनी सभा गाजवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी कोल्हापूर शहरासह इचलकरंजीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याबरोबरच जिल्ह्यात विविध भागात लहान-मोठ्या सभा पदयात्रा झाल्या. शहरासह जिल्ह्यात घरोघरी हँडबिल्स पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज कार्यरत होती. सायंकाळनंतर उमेदवारांसह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी चौका चौकात गावागावांत आपल्यापरीने संवाद साधण्यात मग्न होते.

कोल्हापुरात दुरंगी, हातकणंगलेत चौरंगी

कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे खा. संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांच्यात मुख्य लढत होत आहे; तर हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे खा. धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ. सत्यजित पाटील सरुडकर, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि वंचित आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात चौरंगी लढत होत आहे.

Back to top button