मोलॅसिस टाकी साफ करताना कामगाराचा गुदमरून मृत्यू | पुढारी

मोलॅसिस टाकी साफ करताना कामगाराचा गुदमरून मृत्यू

गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातील मोलॅसिस टाकीची साफसफाई करताना उष्म्यामुळे निर्माण झालेला विषारी वायू व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चौघे कामगार गुदमरून बेशुद्ध पडले. त्यांच्या मदतीसाठी धावलेला माथाडी कामगारही बेशुद्ध झाला. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता संजय कांबळे (वय 58, रा. वसगडे, ता. करवीर) या कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व अविनाश शिंदे यांनी घेतला. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल, असे करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर व गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी सांगितल्यानंतर कांबळे व शिंदे यांनी आपला पवित्रा मागे घेतला.

पशुखाद्य कारखान्यामधील मोलॅसिस टाकीच्या सफाईसाठी राजेश भांदिगरे, संभाजी दाभाडे, दीपक भुई, संजय कांबळे गेले होते; परंतु उष्म्यामुळे मोलॅसिसचे विषारी वायूमध्ये रूपांतर झाले होते. त्यामुळे कर्मचार्‍यांचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले. घटनास्थळी असणारे माथाडी कामगार रवी मेकेरी (रा. गडमुडशिंगी) यांनी इतर कर्मचार्‍यांना वाचवण्यासाठी टाकीमध्ये प्रवेश केला; परंतु मेकेरी हेसुद्धा बेशुद्ध झाले. दरम्यान, इतर कर्मचार्‍यांनी सगळ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; पण कांबळे यांचा मृत्यू झाला.

कष्टकरी कुटुंबावर आघात

मृत संजय कांबळे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सर्वजण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.
कष्टकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

Back to top button