निरगुडसर फाटा-वैद्यवाडी फाटा रस्ता खड्ड्यात | पुढारी

निरगुडसर फाटा-वैद्यवाडी फाटा रस्ता खड्ड्यात

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा: निरगुडसर फाटा (ता. आंबेगाव) ते वैद्यवाडी-जारकरवाडी फाटा या साधारण एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांची कसरत होत असल्याने रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर व पाबळ, केंदूर, कान्हूरमेसाई (ता. शिरूर) या परिसरातील नागरिकांना मंचर, अवसरी खुर्द, घोडेगाव, भीमाशंकर या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे.

मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शिवाय गेले तीन-चार दिवस या भागात पाऊस सुरू झाल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. एका वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्यावरून पन्नास वेळा गेले असतील; मग त्यांना ते खड्डे दिसले नाहीत का? असा संतापजनक सवाल वाहनचालकांकडून विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.

 

Back to top button