पिंपरी : वाहन चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन | पुढारी

पिंपरी : वाहन चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महागाईच्या काळात व कोरोनातून सावरत असताना सर्वसामान्यांना हे परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोनने ‘वाहन चोरीपासून सावधान!’ या शीर्षकाखाली शहरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. नागरिकांना वाहन चोरी होऊ नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी याबाबत अवगत
केले आहे.

शहर वाढते आहे, त्याबरोबरच दुचाकी व चार चाकी वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतानाही वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. हरवलेल्या वाहनांचा शोध लागून ते हाती लागण्याचे
प्रमाणही कमी आहे. वाहन चोर वेगवेगळे फंडे वापरत असल्याने पोलिसही हतबल झाल्यासारखी स्थिती आहे.

आपापल्या परीने पोलिस प्रशासक तसेच नागरिक चारचाकी/दुचाकी वाहने चोरी होऊ नये यासाठी दक्षता घेत असतात. परंतु, सर्व प्रयत्न करूनदेखील वाहन चोरी होतेच. अशा चोर्‍या रोखण्यासाठी उपाययोजना केल्यास मोठ्या प्रमाणावर वाहन चोरीस आळा बसेल, त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी पोलिस खाते सरसावले आहे.

वाहन चोरी रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत वाहनचालकांना अवगत करण्यात आले आहे. आपल्या परिसरात संशयित वाहन उभे असल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी केले आहे.

वाहनाचे लॉक सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी

वाहनाला पार्किंग करताना पुढील चाकाला सेंटर लॉक बसवावे

वाहनाला आधुनिक पद्धतीचा अलार्म लावण्यात यावा

वाहनाला जी. पी. एस. सिस्टीम लावावी

सीसीटीव्हीच्या कक्षेत आपले वाहन पार्किंग करावे

कोणी संशयित इसम वाहनास छेडछाड करताना आढळून आल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी

वाहन पार्किंग करून लॉक करावे व काचा उघड्या राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Back to top button