ताथवडे : सेवा रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य | पुढारी

ताथवडे : सेवा रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य

ताथवडे : येथील पुणे-मुंबई महामार्गावरील पुनावळे पुलानजीक असणार्‍या सेवारस्त्यावर कचर्‍याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साचले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जागोजागी कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे महामार्गाचे विद्रुपीकरण झाले आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

पुनावळेत अनेक उच्चभ्रू सोसायट्या आहेत. काही बेजाबदार नागरिक रात्रीच्यावेळी या ठिकाणी कचरा टाकतात. पुनावळेतील आजूबाजूला असलेल्या हॉटेलमधील कचराही या ठिकाणी टाकत असल्याचे दिसून येत आहे. कित्येक दिवस झाले हा कचरा उचलला न गेल्यामुळे या ठिकाणी कचर्‍याचे ढीग जमा झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे कचरा कुजून गेलेला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

कुजलेल्या कचर्‍यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता बळावली असून त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत आहे.पिंपरी चिंचवड शहर कचराकुंडी मुक्त करण्याकडे वाटचाल करत असताना अशा कचर्‍याच्या ढिगामुळे याला तिलांजली मिळत आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील दुतर्फा असे अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले असून याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, लवकरात लवकर हे कचर्‍याचे ढिगारे उचलून परिसर स्वच्छ करावा. अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Back to top button