पिंपरी: महापालिकेच्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये घोळ; शेजारील प्रभागाच्या यादीत शेकडो नावे | पुढारी

पिंपरी: महापालिकेच्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये घोळ; शेजारील प्रभागाच्या यादीत शेकडो नावे

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे. प्रभागातील मतदारांची नावे शेजारच्या प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. निवडणूक विभागाने गाफील राहून काम केल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक व इच्छुक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, सोमवार (दि.27) पर्यंत 38 हरकती नोंदविण्यात आल्या. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचना अंतिम करण्यात आली. त्यावर ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 31 मे 2022 पर्यंतच्या मतदार यादी फोडून 1 ते 46 प्रभागात मतदारांची विभागणी केली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 23 जूनला आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केली. येत्या 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील चुका व मतदारांच्या नावाबाबत शुक्रवार (दि.1) पर्यंत पालिका सूचना व हरकती स्वीकारणार आहे. आतापर्यंत निवडणूक विभागाकडे 38 हरकती नोंदविण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. मात्र, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणाच चुका व त्रुटी असल्याची ओरड माजी नगरसेवक, इच्छुक व राजकीय कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

माजी नगरसवेकांकडून थेट हजार हजार मतदारांच्या नावांबाबत घोळ झाल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी जास्त मतदारांच्या नावाबाबत आक्षेप आहेत. त्यांची यादी तयार करून हरकती घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
मतदार याद्यांवरील हरकतींबाबत निवडणूक विभागाचा कर्मचारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार आहे.मतदार नेमका कोणत्या प्रभागात आहे, हे निश्चित केेले जाणार आहे. त्यानंतर योग्य प्रभागात मतदार असल्याची खात्री होणार आहे. त्यासाठी पालिकेने आज प्रगणकांना (बीएलओ) प्रशिक्षण दिले.

हरकतींवर 7 दिवसांत कार्यवाही करणार
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. विविध तक्रारी प्राप्त होत आहे. सर्व तक्रारींची योग्य पडताळणी करून संबधित मतदारांची खातरजमा झाल्यानंतर अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. ते काम राज्य निवडणूक आयोगाच्या 9 जुलैपर्यंतच्या मुदतीत म्हणजे सात दिवसांत पूर्ण केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा

संजय राऊत हे शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत ; दीपक केसरकर

पिंपरी : हॉकी प्रशिक्षणासाठी पालिकेचा आता नवीन प्रयोग; आंतरराष्ट्रीय हॉकी केंद्राची स्थापना

पिंपरी: स्वच्छतेबाबत नागरिकच करताहेत जनजागृती

 

Back to top button