पिंपरी : हॉकी प्रशिक्षणासाठी पालिकेचा आता नवीन प्रयोग; आंतरराष्ट्रीय हॉकी केंद्राची स्थापना | पुढारी

पिंपरी : हॉकी प्रशिक्षणासाठी पालिकेचा आता नवीन प्रयोग; आंतरराष्ट्रीय हॉकी केंद्राची स्थापना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हॉकी प्रशिक्षणाबाबत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. विक्रम पिल्ले हॉकी अ‍ॅकॅडमीसोबत पिंपरी-चिंचवड हॉकी अ‍ॅकॅडमी स्थापन केल्यानंतर आता, हॉकी महाराष्ट्रच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून तयार झालेले हॉकीपटू सन 2028 मध्ये केंद्राचे हॉकीपटू ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना हॉकीचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी पालिकेने विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे पिंपरी-चिंचवड हॉकी अ‍ॅकॅडमी सुरू केली. तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. अ‍ॅकॅडमी जून 2019 ला सुरू झाली.
मात्र, मार्च 2020 पासून आलेल्या कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे पालिकेच्या शाळा बंद झाल्याने हॉकी प्रशिक्षणही बंद झाले. लॉकडाऊन शिथिल होऊन शाळा सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू झाले. पुन्हा लॉकडाऊन लागल्याने शाळा बंद झाल्याने प्रशिक्षण बंद झाले.

दरम्यान, विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीने पालिकेसोबत पाच वर्षांसाठी झालेला करार रद्द करण्याबाबत पालिकेस 27 मे 2022 ला पत्र दिले. तत्कालिन आयुक्त हर्डीकर यांची योजना गुंडाळून आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नवीन योजना आणली. औंध येथील हॉकी महाराष्ट्रच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचा निर्णय त्यांनी घेतला. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या निर्णयास सर्वसाधारण सभेत आयुक्त पाटील यांनी नुकतीच मंजुरी दिली. हे केंद्र दहा वर्षासाठी असणार आहे. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा

पिंपरी: स्वच्छतेबाबत नागरिकच करताहेत जनजागृती

सांगली : अग्निपथमुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात

Back to top button