सुनेत्रा पवारांना शेतकरी कृती समितीचा बिनशर्त पाठिंबा : सतीश काकडे | पुढारी

सुनेत्रा पवारांना शेतकरी कृती समितीचा बिनशर्त पाठिंबा : सतीश काकडे

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. गडदरवाडी येथे सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांनी सोमेश्वर व पुरंदर परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या वेळी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वरचे संचालक अजय कदम, शहाजी जगताप, माजी संचालक दिलीप फरांदे, दिग्विजय जगताप, संतोष कोंढाळकर, सतीशराव जगताप, नंदकुमार शिंगटे, वैभव गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना सतीश काकडे म्हणाले, या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या अंतर्गत कलहात आपण लक्ष न देता सुनेत्रा पवार यांना मत दिल्यास ते मत थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी थेट संबंध असून या दोघांच्या भेटीसाठी त्यांना कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही.

त्यामुळे बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासास मिळालेली गती पाहता उर्वरित भोर, पुरंदर, खडकवासला, दौंड, इंदापूर या तालुक्यांचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्थानिक गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अवाहन सतीश काकडे यांनी केले. शेतकरी कृती समितीच्या वतीने जाहीर बिनशर्त पाठिंबा सुनेत्रा पवार यांना देण्याचा एकमुखी निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.

सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या जानेवारी महिन्यामध्ये तुटणार्‍या उसास 75 रुपये, फेब्रुवारीतील उसाला 100 रुपये व मार्च महिन्यात तुटणार्‍या उसास 150 रुपयांपर्यंत प्रतिमेट्रिक टन अनुदान जाहीर केले होते. तसेच एप्रिलपासून तुटणार्‍या उसास 200 रुपये प्रतिमेट्रिक टन अनुदान मिळणार आहे. ज्या सभासदांचे जळीत उसाचे अंदाजे 2 लाख मेट्रिक टनाचे 50 रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे कपात केले आहेत ते पैसेदेखील सभासदांना परत मिळणार आहेत. तसेच लवकरच अजित पवार यांना भेटून गेटकेनधारकांना मिळू शकत नसणारे खोडकी बिल 300 रुपयांप्रमाणे कारखान्याच्या सर्व सभासदांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

– सतीश काकडे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

हेही वाचा

 

Back to top button