पिंपरी: स्वच्छतेबाबत नागरिकच करताहेत जनजागृती | पुढारी

पिंपरी: स्वच्छतेबाबत नागरिकच करताहेत जनजागृती

दीपेश सुराणा

पिंपरी:  स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महापालिकेने बनविलेल्या सेल्फी पॉइंटचा गेल्या आठवडाभरात तब्बल 10 हजार नागरिकांनी लाभ घेतला. या नागरिकांनी स्वतःचे व्हिडिओ बनवून घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम केले. महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय, प्लास्टिकमुक्त वारीची संकल्पना देखील राबविली जात आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 21 तारखेला तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे 22 तारखेला शहरात आगमन झाले.

त्या दिवशी 2 चित्ररथाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, 360 अंशात गोलाकार फिरणारा सेल्फी पॉइंट अनुक्रमे निगडीतील भक्ती-शक्ती चौक आणि दिघीतील मॅगझीन चौक याठिकाणी उभारला होता. मी स्वच्छाग्रही, प्लास्टिकच्या वापराला नाही म्हणा, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल, परिसर स्वच्छ ठेवेल असे विविध संदेश या सेल्फी पॉइंटद्वारे देण्यात आले. या सेल्फी पॉइंटवर उभे राहून नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरुकता करणारे आपले 13 ते 15 सेकंदांचे व्हिडिओ बनवून घेतले. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडियावर त्याचे स्टेटस ठेवून जनजागृती केली.

प्रभागांमध्येही फिरविला सेल्फी पॉइंट
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे शहरातून पुण्यासाठी प्रस्थान झाल्यानंतर देखील हा सेल्फी पॉइंट 8 क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभागांमध्ये फिरविण्यात आला. त्याचा नागरिकांनी लाभ घेतला. तसेच, सोमवारी महापालिका भवनातही हा सेल्फी पॉइंट ठेवण्यात आला होता. महापालिका भवनात येणारे नागरिक आणि कर्मचारी कुतूहलाने या सेल्फी पाँइंटवर जाऊन आपले व्हिडिओ बनवुन घेत होते.

महापालिकेने ‘स्वच्छाग्रह’ मोहिमेतंर्गत गेल्या आठवडाभरात फि रविलेल्या सेल्फी पॉइंटचा जवळपास 10 हजार नागरिकांनी लाभ घेतला. या नागरिकांनी सेल्फी पाँइंटवर उभे राहून आपले 13 ते 15 सेकंदांचे व्हिडिओ बनवुन घेतले. हे व्हिडिओ सोशल मिडियावर टाकून स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

                                          – रवीकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त, महापालिका.

Back to top button