नालेसफाई रामभरोसे; नर्‍हे गावात अतिक्रमणांसह राडारोडा जागेवरच | पुढारी

नालेसफाई रामभरोसे; नर्‍हे गावात अतिक्रमणांसह राडारोडा जागेवरच

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नर्‍हे गावच्या हद्दीतील वाहणार्‍या दोन्ही ओढ्यांमधील राडारोडा आणि अतिक्रमणे ‘जैसे थे’च आहेत. महापालिका प्रशासनाकडून समाविष्ट गावांतील प्रश्न आणि नालेसफाई वार्‍यावरच सोडण्यात आल्याचे यातून समोर आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतून वाहणार्‍या ओढ्यांची व नाल्यांची प्रशासनाकडून सफसफाई केली जाते. नाले व ओढ्यांतील राडारोडा आणि कचरा पात्राबाहेर काढून पात्र रुंद व खोल करण्यासाठी निविदा काढल्या जातात. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते.

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर ओढे व नालेसफाई करण्याकडे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्राधान्य दिले जाते. मात्र, पावसाळा सुरू झाला तरीही महापालिका प्रशासनाने हद्दीमध्ये नव्याने समावेश झालेल्या गावांमधील नालेसफाईकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे समोर आले आहे. नर्‍हे गावच्या हद्दीमधून लेंडी ओढा आणि पीराचा ओढा हे दोन ओढे वाहतात. लेंडी ओढ्याचा उगम स्वामिनारायण मंदिरामागे, तर पीराच्या ओढ्याचा उगम अंबाईदरा येथून होतो.

पाऊस गेला कोणीकडे, पेरण्या खोळंबल्या चोहीकडे; जगाचा पोशिंदा शेतकरी चिंताग्रस्त

या दोन्ही ओढ्यांचा संगम काशीबाई नवले हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस शाहू बँकेजवळ होतो. पुढे हा ओढा वडगाव येथील स्मशानभूमी येथून मुठा नदीला मिळतो. या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि अतिक्रमणे झाल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्या वेळी महापालिका अधिकार्‍यांनी पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणे आणि राडारोडा काढून ओढ्याची साफसफाई केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, पावसाळा सुरू झाला तरीही या दोन्ही ओढ्यांतील राडारोडा आणि अतिक्रमणे जागेवरच आहेत. त्यामुळे समाविष्ट गावांमधील प्रश्नांकडे प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय…!
प्रशासनाने लेंडी ओढ्यातील साफसफाईचे काम काही ठिकाणी हाती घेतले आहे. काही ठिकाणी भूमीगत केलेल्या ओढ्यातून चेंबरमधून राडारोडा काढला जात आहे, तर काही ठिकाणी खोदाई करून राडारोडा टिकाव खोर्‍याच्या माध्यमातून काढण्याचे काम सुरू आहे. मात्र हा राडारोडा पात्राच्या बाहेर काढायचा सोडून खड्डा असलेल्या ठिकाणी पात्रातच टाकला जातो. खरे तर वर्षानुवर्षे साचलेला राडारोडा जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढणे गरजेचे आहे. प्रशासनाची ही नाले सफाई ‘आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय’ या म्हणीसारखीच सुरू आहे.

हेही वाचा

मिरा-भाईंदर: बायोमिथेनायजेशन प्रकल्पातून दररोज 300 वॅट वीजनिर्मिती

पिंपरी : मुंडी छाटून टाकण्याची रावण गँगकडून धमकी

गणपतीसाठी ठाण्यातून कोकणात १००१ बस

Back to top button