जलसंकट! सांगवीकरांना मिळतेय तीन दिवसाआड पाणी

जलसंकट! सांगवीकरांना मिळतेय तीन दिवसाआड पाणी

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी हे बागायती पट्ट्यात आहे. सध्या या गावात मानवनिर्मित पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जलजीवन योजनेचे रखडलेले काम, बोगस नळजोडणी, टँकरने होणारी पाण्याची चोरी, ग्रामपंचायतीची उदासीनता आदी कारणांमुळे सांगवीकरांना तीन दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त आहे. वेळप्रसंगी अजूनही पाणी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सांगवी गावातील नागरिकांसाठी नियमितपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. परंतु अलिीकडच्या काळात ढिसाळ नियोजनामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्या निर्माण होत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी जलजीवन योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला.

परंतु या योजनेचे काम वारंवार कोणत्याही कारणास्तव बंद पडत आहे. एवढे मोठे काम असताना कोणीच याकडे गांभीर्याने पहाताना दिसत नाही. सांगवी गावासाठी दोन पाण्याचे साठवण तलाव आहेत. एक कांबळेश्वर परिसरातील बारवनगर येथे, तर दुसरा तावरे वस्ती येथे तलाव आहे. सध्या तावरे वस्ती येथील तलावाचे काम चालू आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. सध्या संपूर्ण सांगवी गावाला तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे.

हा पाणीपुरवठा करत असताना अनेक जणांनी बोगस नळजोडणी करून पाण्याची चोरी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परंतु ग्रामपंचायत पातळीवर यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात उदासीनता दर्शविली जात असल्याचा आरोपदेखील होतो आहे. मुख्य साठवण तलावासह इतर ठिकाणच्या स्रोतातून टँकरने पाणी चोरी होत असताना ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करत असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व गोष्टींवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने अनेक गोष्टी फोफावत चालल्या आहेत.

जलसंपदाच्या आदेशानुसार पाणीपुरवठा

याबाबत सरपंच चंद्रकांत तावरे व ग्रामविकास अधिकारी संजय चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दि. 4 जुलैपर्यंत कालव्याद्वारे पाणी येणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणीकपात करावी लागत आहे. जलजीवनचे अधिकारी सहकार्य करीत नाहीत. बोगस नळजोडणी कापण्यास सुरुवात केली आहे. काही टँकरने पाणी चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाणीपातळी खालावली

बारवनगर येथील साठवण तलाव तीन कोटी लिटर क्षमतेचा आहे. दररोज या तलावाच्या पाण्याची पातळी सात इंचाने कमी होत आहे. एकाच साठवण तलावर संपूर्ण गावाचा भार पडत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news