12 thफेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती : बापाच्‍या पाठबळाने मुलगा ११व्‍या प्रयत्‍नात दहावी पास | पुढारी

12 thफेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती : बापाच्‍या पाठबळाने मुलगा ११व्‍या प्रयत्‍नात दहावी पास

परळी वैजनाथ, प्रा.रविंद्र जोशी

12 th फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटच्या कथानकाची परळी तालुक्यात पुनरावृत्ती झाल्याचे उदाहरण दहावीच्या निकालानंतर समोर आले आहे. अतिशय रंजक वाटावी अशी ही सत्य कथा असून तब्बल १० वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या वडिलांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात ११ व्या प्रयत्नात या मुलाने अखेर यश मिळवले आहे. या गोष्टीचा त्याच्या कुटुंबीयालाच नाही तर अख्या गावाला आनंद झाला आहे.

तू पास होईपर्यंत परीक्षा देत रहा ….

१२ वी फेल हा २०२३ चा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. या चरित्रात्मक नाट्य चित्रपटाच्या कथानकाशी अगदी तंतोतंत जुळणारीच कथा वाटावी अशा प्रकारचे सत्य उदाहरण परळी तालुक्यात दहावी परीक्षेच्या बाबतीत बघायला मिळाले आहे. परळी तालुक्यातील डाबी या गावचे रहिवासी असलेल्या सायस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा सन २०१८ या वर्षात दहावीला होता. तो या परीक्षेत नापास झाला. वडील सायस उर्फ नामदेव मुंडे हे कामगार आहेत. त्‍यांनी संपूर्ण जीवन अतिशय कष्टात व बांधकामावर कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवले आहे. काहीही झाले तरी आपला मुलगा दहावी पास झाला पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती. त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही, तू पास होईपर्यंत परीक्षा देत रहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली.

सारे गाव सुखावले

तब्बल दहा वेळा नापास झाल्यानंतर आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकराव्या प्रयत्नात कृष्णाला अखेर यश मिळाले आहे. या यशाने वडीलांना आनंदाश्रू रोखता आले नाही. एवढेच नाही तर अख्या गावाला या यशाचा आनंद झाला. कृष्णाने उत्तुंग यश मिळवल्यासारखे अभिनंदन त्याचे संपूर्ण गाव करत आहे. अकराव्या प्रयत्नात दहावी पास होणाऱ्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला कृष्णा एक प्रकारे सद्यस्थितीला डाबीकरांचा हिरो बनला आहे. १० वेळा सर्वच विषयात नापास होऊन ११व्या प्रयत्नात ‘मॅजिक सक्सेस’ गाठणाऱ्या कृष्णाचे सर्वच स्तरातून विशेष कौतूक होत आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी या गावात निकालाचा आगळा वेगळा आनंद साजरा केला जात आहे. कृष्णा हा टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच्या या आगळ्या वेगळ्या यशाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

परीक्षेच्या काळातही वडिलांसोबत मजुरी

याबाबत डाबी येथील गावकऱ्यांनी सांगितले की, कृष्णाची घरची परिस्थिती अगदी बेताची असून आईवडिल दोघेही मजुरी करतात. कृष्णाही मजूरीची छोटी मोठी कामे करतो.शाळेतील परीक्षेचे शुल्क भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे तरीही त्याच्या वडीलानी जिद्द सोडली नाही. परीक्षेच्या काळातही पेपर संपल्यानंतर तो वडिलांसोबत मजुरी करत होता. नियमित कामाला जात असल्यामुळे आपण परीक्षा देवू शकणार नाही, असे त्याने वडीलांना सांगीतले होते. पण, वडीलांनी त्याला सतत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज तो अखेर उत्तीर्ण झाला असुन सध्या मित्रांकडून त्याच्या गुणपत्रकाचा फोटो व्हाट्सॲप, फेसबूकवरुन व्हायरल करुन कौतूक केले जात आहे.

लय खस्ता खाल्ल्या…. आता भारतीबुवाला पाच नारळं फोडणार

मी शिकलो नाही. मात्र आपल्या मुलाने शिकले पाहिजे ही माझी जिद्द आहे. मी थर्मलला बांधकाम कामगार आहे.रोजंदारीवर काम करतो.१५ गुंठेच जमीन आहे.हालाखीची परिस्थिती आहे.२०१८ पासून दहावीचा निकाल आला की वाट बघत बसायचो.आज अचानक माझा मुलगा कृष्णाच्या मित्रांनी फोन करून सांगितले की, कृष्णा पास झाला.खुप आनंद व समाधान झाले आहे.मुलाची दहावी व्हावी म्हणून लय खस्ता खाल्ल्यात.आता आमच्या डाबी येथील ग्रामदैवत भारतीबुवा महाराजांना पाच नारळं फोडणार आहे.

सायस उर्फ नामदेव मुंडे
कृष्णा मुंडेचे वडील

Back to top button