टीम इंडियाचा भावी मुख्‍य प्रशिक्षक कोण? BBCI चे मौन कायम | पुढारी

टीम इंडियाचा भावी मुख्‍य प्रशिक्षक कोण? BBCI चे मौन कायम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या  टी-२० विश्वचषक स्‍पर्धेकडे वेधले आहे. या स्‍पर्धेसाठी टीम इंडिया सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. या जागतिक स्पर्धेनंतर संघाचे विद्यमान मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. त्याची शेवटची तारीख 27 मे होती. याबाबत अद्याप ‘बीसीसीआय’ने कोणाच्‍याही नावाची घोषणा केलेली नाही. त्‍यामुळे टीम इंडियाच्‍या मुख्य प्रशिक्षकपदी काेणाची वर्णी लागणार याबाबतचा संभ्रम कायम आहे.

गौतम गंभीरनेही बाळगले मौन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. गंभीर हा आयपीएल 2024 च्या मोसमातील विजेत्या संघ कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR)मुख्‍य प्रशिक्षक होता. मात्र, भारतीय संघाच्‍या मुख्‍य प्रशिक्षक पदाबाबत त्‍याने मौन बाळगले आहे. कोणत्याही मोठ्या परदेशी क्रिकेटपटूने या पदासाठी अर्ज केलेला नाही, असे यापूर्वीच BCCIचे सचिव जय शाह यांनी स्‍पष्‍ट केले आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या रचनेची जाण असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहेत. बीसीसीआयचे लक्ष राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर होते; परंतु त्‍यांनीही इच्छुक नसल्‍याचे यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे.

वृत्तसंस्था ‘पीटीआय’ने बीसीसीआयच्या सूत्राचा हवाल्‍याने म्‍हटलं आहे की, मुख्‍य प्रशिक्षकपदी निवड करण्‍यासाठी निर्णय घेण्‍यास बीसीसीआयला आणखी काही वेळ लागू शकतो. सध्या संघ टी-२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. यानंतर वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती देण्यात येणार आहे. या काळात एनसीएचे वरिष्ठ प्रशिक्षक संघासोबत राहू शकतात. त्‍यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी कोणाची निवड करावी, यासाठी कोणतीही घाईगडबड नाही.

अर्ज दाखल करण्‍याची अंतिम मुदत संपली

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्‍पर्धेपर्यंत राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. याची शेवटची तारीख 27 मे होती. अंतिम मुदत संपूनही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, कारण बोर्डाकडून अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

गौतम गंभीरचे नाव आघाडीवर

आयपीएल अंतिम सामन्‍यानंतर गौतम गंभीरने बीसीसीआय सचिव जय शहा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फाेटाे सोशल मीडियावर व्हायरल झाले  असून त्यामुळे गंभीरच्या भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र, केकेआरचा मालक शाहरुख खानचे गंभीरसोबत खूप जवळचे संबंध आहेत, त्यामुळे त्याला आयपीएल संघ साेडणे शक्‍य आहे का? तसेच गंभीरच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याच्या शक्यतेबाबत सध्या न्यूयॉर्कमध्ये उपस्थित असलेल्य संघातील वरिष्ठ खेळाडूंचे मतही महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. त्‍यामुळे अद्‍याप तरी भारतीय क्रिकेट संघाच्‍या भावी प्रशिक्षकपदाबाबतचा संभ्रम कायम आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button