

भाईंदर : राजू काळे मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पातील ओल्या कचर्याचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. त्यानुसार घनकचरा प्रकल्पातून कचर्यापासून वीजनिर्मिती (बायोमिथेनायजेशन) करणारे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेत त्यासाठी पालिकेचे मोकळे आरक्षित भूखंड निश्चित करण्यात आले. एकूण 7 प्रकल्पांपैकी 4 ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पातून दररोज 300 किलो वॅट वीजनिर्मिती होत असून वीजखरेदीसाठी अदानी कंपनीसोबत चर्चा करण्यात येत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या 4 ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पांतील ओल्या कचर्यातून बायोमिथेनायजेशन प्रक्रियेद्वारे निर्माण होणार्या गॅसमधून दिवसाकाठी 500 किलो वॅटपर्यंत विजेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी खाजगी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालिकेने एकूण 7 पैकी नवघर गावातील आरक्षण क्रमांक 122ब वर अनुक्रमे 10 व 20 मेट्रिक टन, मिरारोडच्या कानाकिया येथील आरक्षण क्रमांक 271, 272, 273 वर 10 मेट्रिक टन व भाईंदर पश्चिमेकडील आरक्षण क्रमांक 140 वर 10 मेट्रिक टन कचर्याचे प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. या प्रकल्पात टाकण्यात येणार्या ओल्या कचर्यापासून वीजनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असता त्यातील ओल्या कचर्यापासून दिवसाला एकूण 300 किलो वॅट वीजनिर्मिती केली जात असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. ही वीज विक्री करण्यात येणार असून त्यासाठी शहराला वीजपुरवठा करणार्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीसोबत चर्चा करण्यात येत आहे.
ओल्या कचर्यावर बायोमिथेनायजेशन प्रक्रियेद्वारे एकूण 500 किलो वॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असून सध्या सुरू असलेल्या प्रकल्पातून दिवसाला 300 किलो वॅट वीजनिर्मिती होत आहे. ह वीज अदानी कंपनीला विकण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच कंपनीसोबत करार केला जाणार आहे. उर्वरित तीन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-रवि पवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य विभाग)