लावणी कलावंतांचे मानधन थकले; वृद्ध कलाकारांपुढे जगण्याचा प्रश्न | पुढारी

लावणी कलावंतांचे मानधन थकले; वृद्ध कलाकारांपुढे जगण्याचा प्रश्न

बारामती : पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाकडून दरमहा तमाशा कलावंतांना मिळणारे मानधन पुन्हा थकले आहे. त्यामुळे वृद्ध तमाशा कलावंतांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुष्यभर महाराष्ट्रभर फिरत लोककला जपणार्‍या कलावंतांना आता शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर जगावे लागत आहे. अनेक वर्षे शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने तमाशा कलावंतांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही कलावंतांपुढील अडचणी संपलेल्या नाहीत. अनेक कलावंत वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळले आहेत. आयुष्यभर राज्यभर फिरून लोकांचे मनोरंजन केले, लोककला जपली, पण आता वृद्धापकाळात कोणीही आधार देत नसल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.

यातील बहुतांश कलावंत 60 ते 90 वयोगटातील आहेत. वृद्धापकाळामुळे मधुमेह, रक्तदाब अशा अनेक आजारांचा ते सामना करत आहेत. अनेकांना तर पोटची मुलेही सांभाळत नसल्याची दुर्दैवी स्थिती आहे. मिळणारे मानधन अपुरे असले तरी त्यात कसे तरी जगता येते. परंतु तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे औषधोपचाराचा खर्च भागवायचा कसा अशी चिंता त्यांना सतावते.
दि. 19 मार्च रोजी दोन महिन्यांचे एकत्रित 4400 रुपये मानधन त्यांच्या खात्यावर जमा झाले होते. त्यानंतर एप्रिल व मे महिन्याच्या मानधनापैकी फक्त एप्रिलचे मानधन 31 मे रोजी जमा झाले. आता जून संपत आला तरी मे महिन्याचे मानधन दिले गेले नाही.

मायबाप राज्य सरकारने आम्हा गरीब कलावंतांवर दया करावी. दरमहा किमान चार हजार रुपये मानधन द्यावे. त्यातून रोजच्या अन्नाचा आणि औषधोपचाराचा खर्च भागू शकेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या. परंतु, अजूनही पाहिजे तशी मदत मिळत नाही.

             – रणधीर मोहिते, राष्ट्रपती प्रशस्तिपत्रविजेते तमाशा कलावंत, बारामती

हेही वाचा 

ठाण्यात शिंदे समर्थकांचे जोरदार शक्‍तिप्रदर्शन

‘जुग जुग जियो’ची शानदार ओपनिंग!

अमेरिकेत पॉपकॉर्न होत आहे महाग!

 

Back to top button