ठाण्यात शिंदे समर्थकांचे जोरदार शक्‍तिप्रदर्शन | पुढारी

ठाण्यात शिंदे समर्थकांचे जोरदार शक्‍तिप्रदर्शन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला गद्दार संबोधल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनीही त्यांच्या घराबाहेर मोठे शक्‍तिप्रदर्शन केले. त्यात महिला कार्यकर्त्यांचा सहभागही लक्षणीय होता.

या समर्थकांनी शिवसेनाप्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेंंचा विजय असो’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे…’ अशा घोषणा दिल्या.

ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख नरेश म्हस्के यांनी आम्ही ठाणेकर शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी शिवसेना सोडलेली नाही. ठाण्यातील सर्व 67 नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत
आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडे सर्व खासदारांनी आग्रह करून आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली होती, असे सांगितले.

Back to top button