अमेरिकेत पॉपकॉर्न होत आहे महाग! | पुढारी

अमेरिकेत पॉपकॉर्न होत आहे महाग!

वॉशिंग्टन : सध्याच्या महागाईच्या काळात कोणत्या वस्तू महाग होतील हे काही सांगता येत नाही. आता अमेरिकेत पॉपकॉर्न, जपानमध्ये कांदा तसेच ज्या देशात पाण्यासारखी बियर पिली जाते, त्या जर्मनीत बाटलीतील बियरही महाग झाली आहे. पुरवठा साखळीतील ताणाचा हा परिणाम आहे.

ऑस्ट्रेलियात गेल्या काही दिवसांपासून लेट्यूसही महाग झाले आहे. जागतिक सप्लाय चेनमधील अडचणींमुळे हे घडत असल्याने आता काही कंपन्या पर्यायी मार्ग शोधत आहेत. जर उत्पादकांनी काचेच्या बाटल्या किंवा अ‍ॅल्युमिनियमचे कॅनच बनवले नाहीत तर लोकांना सोडा किंवा बियरचा पुरवठा कसा होणार? शिपिंग कंटेनरची कमतरता तसेच कामगारांचीही उणीव यामुळे या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. रशिया व युक्रेनच्या युद्धामुळेही धान्य, खाद्यतेल महाग झाले आहेत. कोरोना महामारी, विपरीत हवामान, वाढती मागणी या सर्व गोष्टींचा महागाईवर परिणाम होत आहे. अनेक रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणार्‍या सॉस श्रीरचीही टंचाई झाली आहे. चिली पेपर्सची टंचाई असल्याने हा सॉस बनवणार्‍या ‘ह्यू फोंग फुड्स’ या कंपनीला आपले उत्पादन बंद करावे लागले आहे. अमेरिकेत मक्याच्या शेतीऐवजी अन्य पिकांची शेती अधिक केली जात असल्याने अमेरिकेत पॉपकार्न महाग झाले आहे.

Back to top button