पुणे : कोरोना संसर्गामुळे पती पाठोपाठ पत्नीचाही मृत्यू | पुढारी

पुणे : कोरोना संसर्गामुळे पती पाठोपाठ पत्नीचाही मृत्यू

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : शिरसगाव काटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ज्येष्ठ पती पत्नींचा आठ दिवसांच्या अंतराने कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन ज्येष्ठ व्यक्तींना एकाच आठवड्यात कोरोनाने हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरसगाव काटा येथील गुलाब तुकाराम केदारी (वय ७२) व सोनाबाई गुलाब केदारी (वय ७०) यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर प्रथम सोनाबाई यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान अधिक संसर्ग झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी केडगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे प्रकृती खालावल्याने पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हे हि वाचा : 

दरम्यान, गुलाब केदारी यांना ही कोरोना लागण झाल्याने न्हावरे येथे दाखल केले होते. काही काळ उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारांसाठी पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. येथील रुग्णालयात काही काळ उपचार केल्यानंतरही शरीराने साथ न दिल्याने अखेर त्यांनाही काळाने हिरावून नेले.

वारकरी संप्रदायाचा वारसा

गुलाब केदारी हे शिरसगाव मधील धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे. तर सोनाबाई या देखील पायी वारीत दरवर्षी सहभागी होत असायच्या. काही दिवसापूर्वी डोळ्यांच्या तपासणी शिबिरात मोती बिंदुचे निदान केल्यानंतर गुलाब केदारी यांची मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शिरसगाव काटा येथील शंकेश्र्वर प्रासादिक दिंडी सोहळ्यात गेले काही वर्षे ते चोपदार म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती

सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर भारतात पुन्हा कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी पाच महिन्यांत सर्वात कमी कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली होती.

गेल्या २४ तासांमध्ये ३५,१७८ नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ४४० कोरोना बाधितांना आपला आपला जीव गमावावा लागला आहे. मंगळवारी ३७,१६९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे २४३१ रुग्णांमध्ये घट झाली आहे.

हा व्हिडिओ पाहिला का ? : पुढारी आरोग्य संवाद : ‘कोरोना लसीकरण, औषधोपचार आणि त्यांचे पेटंट’ – डॉ. मृदुला बेळे

 

Back to top button