सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण : पोलिसांना माहिती दिली अन् नोकरी गमावून बसला | पुढारी

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण : पोलिसांना माहिती दिली अन् नोकरी गमावून बसला

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : सिद्धी नाईक संशयास्पद मृत्यू प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. अद्याप पोलिसांना सिद्धीविषयी ठोस काहीच हाती लागलेले नाही. गायब होण्यापूर्वी एका खासगी बस युवा वाहकाने सिद्धीला म्हापसा पोलिस स्थानकावर पाहिले होते. त्याने पोलिसांना जो जबाब दिला तोच आता त्याला महागात पडला आहे. पोलिस मित्र म्हणून त्या युवकाने मदत केली, पण त्याला आता नोकरीवर पाणी सोडून घरी बसावे लागले आहे.

विशेष म्हणजे, सिद्धीच्या वडिलांनी तिला कामावर जाण्यासाठी ग्रीनपार्क जंक्शनवर सोडले होते. त्यानंतर शेवटच्या व्यक्तीने सिद्धीला प्रत्यक्ष पाहिले तो हाच वाहक आहे, असे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे.

यात माझा काय दोष?

सिद्धी नाईकच्या संशयास्पद मृत्यूप्रकारानंतर पोलिस पुन्हा-पुन्हा आपणास कामावरून चौकशीसाठी बोलावून घेत होते. अशाने माझे काम हातातून गेले आहे. दुसर्‍यांना मदत करण्यासाठी गेलो व स्वतःचे काम गमावून बसलो, यात माझा काय दोष? असा प्रश्न तो बस वाहक करीत आहे.

आपल्यावर आता बेरोजगार राहण्याची वेळ ओढवल्याचे या युवक वाहकाने म्हटले आहे. त्या मुलीला मी पाहिले व तपासात मदत करण्याचा प्रयत्न केला यात माझे काय चुकले? अशी आपबिती हा वाहक सांगत आहे.

तपासावेळी या वाहकाने पोलिस जबाबात सांगितले की, बेपत्ता होण्याच्या दिवशी म्हापसा बस स्थानकावर सकाळी 11.30 वाजता मी सिद्धीला पाहिले होते. ती शिवोली-मोरजी बसेस थांबतात त्या ठिकाणी उभी होती. यावेळी सिद्धी आपल्याच विचारात मग्न होती व स्वतःच तोंडात पुटपुटत होती, असे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे हा बसवाहक सिद्धी ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेत ती शिकत होती. संबंधित वाहक हा म्हापसा-पणजी मार्गावरील बसमध्ये काम करीत होता.

सिद्धीने जांभळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. या वाहकाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर आपण सिद्धीचा फोटो पाहिला, त्यात ती बेपत्ता झाल्याचे समजले. त्यानंतर आपण त्या पोस्टवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तिच्या वडिलांशी बोलणे झाले. त्यांना सिद्धीविषयी माहिती दिली. त्यानंतर म्हापसा पोलिस स्थानकातून आपणास फोन आला आणि पोलिसांनी आपला जबाब नोंदवून घेतला.

पोलिसांनी संशयित तिघा युवकांना चौकशीसाठी बोलावले होते. या युवकांना सिद्धीचे वडिलांना ते संबंधितांना ओळखतात का? असेही पोलिसांनी विचारले. मात्र, वडिलांनी ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कळंगुट ते बागा या परिसरात वडिलांना सोबत घेऊन विविध घटनास्थळाची पाहणीसुद्धा केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सिद्धी नाईक बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह विवस्र अवस्थेत कळंगुट किनारी सापडला होता. त्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अद्याप पोलिसांना हा मृतदेह विवस्र अवस्थेत किनार्‍यावर कसा पोहचला हे कळू शकलेले नाही किंवा सिद्धीचे गायब झालेले कपडे किंवा चपला सापडल्या नाहीत. तसेच उपलब्ध झालेल्या काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिची छबी आढळली नसल्याची माहिती हाती आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त; तपासात अडचण

सिद्धीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सिद्धीला कामावर जाण्यासाठी ग्रीनपार्क जंक्शनवर सोडले. त्यानंतर सिद्धी पर्वरी येथे कामावर गेली की पुन्हा ग्रीनपार्क येथूनच थेट दुसरी बस पकडून म्हापसा स्थानकावर माघारी परतली, हे समजू शकलेले नाही. तसेच म्हापसा पोलिस स्थानकावरील तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे सध्या नादुरूस्त झाल्याने पोलिसांना तपासात काहीही मदत होऊ शकली नाही.

Back to top button