बसचे भाडे परवडेना अन् रेल्वे काही थांबेना; पुरंदर तालुक्यातील चित्र! | पुढारी

बसचे भाडे परवडेना अन् रेल्वे काही थांबेना; पुरंदर तालुक्यातील चित्र!

समीर भुजबळ

वाल्हे : इंधन दरवाढीने उच्चांक गाठल्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांना बसला आहे. बसचे भाडेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशा वेळी एकमात्र रेल्वेप्रवास आवाक्यात असला तरी रेल्वेमार्गांवरील अनेक गावांत रेल्वे थांबतच नाही. त्यामुळे तेही मृगजळासारखे झाले आहे. ही बाब विचारात घेऊन पॅसेंजर गाड्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा मुख्य रेल्वेमार्ग पश्चिम महाराष्ट्रातून जातो. पुणे ते मिरज हा मार्ग ब्रिटिशकाळापासून अस्तित्वात आहे. सध्या या मार्गावर पुणे ते मिरज यादरम्यान जुन्या लाइनवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लोहमार्ग दुहेरीकरण आणि दुहेरी लाइनच्या विद्युतीकरणाचे कामही लवकरच होईल. यामुळे पुणे-मिरज यादरम्यानचा रेल्वेप्रवास गतिमान होणार आहे. देशाच्या महत्त्वाच्या शहरांना जोडणार्‍या गाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात वाढ नक्कीच झाली. केवळ प्रवासी वाहतूक नव्हे, तर मालवाहतूक देखील या मार्गावरून वाढली.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यासाठी मोठे योगदान दिले. गेली पाच वर्षे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट दर परवडणारे असल्यामुळे शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना तो सोयीचा आहे. शेतकर्‍यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी पुण्याला घेऊन जाण्याकरिता पॅसेंजर रेल्वेगाडी अत्यंत उपयुक्त आहे. सातारा-पुणे डेमू, कोल्हापूर-पुणे पॅसेंजर आणि सातारा-पुणे, सातारा-कोल्हापूर या गाड्या पुरंदर-हवेली तालुक्यातील लहान-लहान स्थानकांवरही थांबत होत्या. त्यामुळे सर्वांना रेल्वेप्रवास सोयीचा होता. आता वरीलपैकी सातारा-पुणे, सातारा-कोल्हापूर ही एकच गाडी थांबत असल्याने पर्याय कमी झाले आहेत. त्यामुळे गावोगावच्या नागरिकांना खासगी वाहने किंवा एसटी बसचा आधार घ्यावा लागत आहे. हा प्रवास खिशाला परवडणारा नसल्याने ते त्रस्त झाले आहेत.

शहरात ये-जा करणे अवघड

सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातून बहुतांश तरुण उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी पुणे, मुंबईला जातात. तेथील राहणे, खाणे परवडणारे नसल्याने सकाळी लवकर निघून रात्री पुन्हा गावी येतात. गावोगावच्या तरुणांसाठी हा चांगला पर्याय होता. आता तीनपैकी एकच गाडी उपलब्ध असल्याने हा प्रवास गैरसोयीचा ठरत आहे.

रेल्वेच्या तुलनेत बसचे दर चौपट

शिक्षण व नोकरी-व्यवसायासाठी पुणे शहरात ये-जा करणारे पुरंदरच्या ग्रामीण भागातील वाल्हे, दौंडज व परिसरातील तरुण, कामगार, शेतकरी महागाईने त्रस्त झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे रेल्वेच्या तुलनेत बसचे दर चौपट झाले आहेत. रेल्वेला 25 रुपये तिकीट असेल तर एस. टी. बसला 100 रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय रस्त्याने जाताना वाहतूक कोंडी आहेच. रेल्वेने कमी दरात, वेळेत आणि सुरक्षितपणे ये-जा करता येते. याकरिता कोरोनाकाळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा त्याच वेळेत सुरू करण्याबरोबरच नवीन दोन गाड्या सकाळी-सायंकाळी वाढवाव्यात, अशी मागणी दौंडजच्या सरपंच सीमा भुजबळ यांनी केली आहे.

पुरंदर, हवेलीत दहा रेल्वेस्थानके

पुणे-मिरज रेल्वेमार्गावर पुरंदर, हवेली तालुक्यात एकूण 10 स्थानके आहेत. यात सातारा जिल्ह्यातून प्रवेश केल्यानंतर पुरंदरमधील निरा हे पहिले स्थानक आहे. त्यानंतर वाल्हे, दौंडज, जेजुरी, राजेवाडी, आंबळे; हवेलीमधील शिंदवणे, आळंदी (महतोबा), फुरसुंगी, सासवड रोड व घोरपडी रोड यांचा समावेश आहे. यातील आठ स्थानके लहान असल्याने तेथे एकच पॅसेंजर थांबते.

पुणे ते मिरज हा रेल्वेमार्ग पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातून गेला आहे. परंतु, या लोहमार्गावरील गावांना आजवर म्हणावा तसा फायदा झाला नाही. जवळपास पन्नास टक्के जनता रेल्वेप्रवासापासून वंचित आहे. अनेकांनी तर रेल्वेने प्रवासच केला नाही. पॅसेंजर रेल्वेगाड्या वाढविल्यास या मार्गावरील गावोगावच्या नागरिकांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल.
– अमोल खवले, सरपंच, वाल्हे

हेही वाचा :

 

 

Back to top button