

वॉशिंग्टन : 'नासा'ने म्हटले आहे की हबल स्पेस टेलिस्कोपने ब्रह्मांडाच्या विस्तारावर एक अनोखे आणि महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहे. या अंतराळ दुर्बिणीने ब्रह्मांड फैलावण्याची गती अनुमानापेक्षा अधिक असल्याचे दाखवले आहे. तसेच या गतीमधील फरकावरून ब्रह्मांडात काही तरी अनोखे घडत असल्याचेही दिसून आले आहे.
'नासा'ने या गतीबाबतच्या डेटामधील फरकाला एक रहस्यच ठरवले आहे. वैज्ञानिक सातत्याने विस्तार पावत असलेल्या ब्रह्मांडावर संशोधन करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून खगोल वैज्ञानिक 'हबल' सारख्या टेलिस्कोपच्या माध्यमातून ब्रह्मांड फैलावत असल्याचे पाहत आहेत. अर्थात आता जसे जसे अचूक आकडेवारी मिळत आहे, त्यावरून काही अनोखे पाहण्यास मिळत आहे. 'बिग बँग'नंतरचा ब्रह्मांडाचा विकासदर आणि आजचा विकासदर यांच्या डेटामध्ये असमानता आहे. ही असमानताही वैज्ञानिकांना चकीत करीत आहे. आपल्या ब्रह्मांडात काही तरी विचित्र घडत असल्याचे हे दर्शवत आहे. ही एखाद्या नव्या सृजनाचीही नांदी असू शकते असे संशोधकांना वाटते. हबल टेलिस्कोप गेल्या तीस वर्षांपासून अंतराळ आणि काळाचा डेटा एकत्र करीत आहे. त्याचा वापर संशोधक ब्रह्मांडाच्या विकासाचा दर जाणून घेण्यासाठी करीत आहेत.