पुणे : प्रियकर प्रेयसीच्या वादात मित्राचा बळी | पुढारी

पुणे : प्रियकर प्रेयसीच्या वादात मित्राचा बळी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीच्या संबंधाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण करण्यात आली. हे पाहुन त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राचा प्रेयसीच्या मामाने तलवारीने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 29) पावणे अकराच्या सुमारास लोकमान्य नगर येथील पोस्ट ऑफिससमोर घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली. तसेच इतर 5 ते 6 जणाविरुद्ध खून केल्‍याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : अंत्यसंस्कार करताना भडका उडून ११ जण जखमी

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रसाद उर्फ गणेश रविंद्र गायकवाड (वय 21, रा. गणेशमळा) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तुकाराम मारुती दारवटकर (वय 41, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर माउली मारुती दारवटकर (वय 41, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता), पौर्णिमा रविंद्र भरगुडे (वय 22, रा. लोकमान्य नगर) यांच्यासह 5 ते 6 जणाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राहूल याचा कपड्याचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता राहूल व त्याचा मित्र दुचाकीवरून घरी निघाले होते. लोकमान्यनगर येथे पोहचले असता, राहूल याला त्याची प्रेयसी पोर्णिमा काम करत असलेल्या मॅनेजरच्या दुचाकीवरून येत असताना दिसली. हा प्रकार पाहिल्यानंतर राहुल याने मॅनेजरला रस्त्यावर थांबवून तुमच्या दोघात काय चालले आहे अशी विचारणा केली. यावेळी मॅनेजर व राहूल यांच्यात वादावादी झाली. पोर्णिमाने तो दुकानातील मॅनेजर असल्याचे राहुल याला सांगितले. त्यावेळी राहूल याने मॅनेजरच्या कानाखाली लगावली. तरुणीने फोनद्वारे मामा तुकाराम व माऊली दारवटकर यांना माहिती दिली. काही वेळातच पोर्णिमाचे मामा व इतर चार ते पाच जण तेथे आले.

दरम्‍यान, तरुणीचे मामा व इतर लोकांनी राहूल व त्याचा मित्र राज पवार या दोघांना शिविगाळ व मारहाण केली. तेव्हा, फिर्यादी याचा मावसभाऊ रोहित मुळे व त्याचा मित्र गणेश गायकवाड तेथून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यामुळे ते दोघे भांडणे सोडविण्यासाठी तेथे आले. त्याचवेळी तुकारामने कमरेच्या बाजूला असलेली छोटी तलवार बाहेर काढून राहूलवर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत राहूल याने तो वार चुकवला व तो वार गणेश याच्यावर झाला. यावेळी गणेशच्या डाव्या बरगडीत ती तलवार भोकसली गेली. वर्मी घाव लागताच गणेश जोराने ओरडत भाऊ मला लागलय असे म्हणत मोठ्याने ओरडत पळू लागला. राज याने त्याच्या पाठीमागे जावून एका दुचाकीवरून गणेश याला ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले होते. गणेश याला पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगशेकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर तलवारीने वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी मामा तुकाराम दारवटकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह इतर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
सुनिल माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रामबाग

Back to top button