पुणे : अंत्यसंस्कार करताना भडका उडून ११ जण जखमी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : अंत्यसंस्कार करतेवेळी डिझेल टाकत असतानाच अचानक भडका उडाला. दरम्यान मृतदेहाजवळ असलेले ११ जण भाजले. ही घटना कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना शनिवारी (दि.30) सायंकाळी 6.30 वाजता घडली. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे तर तिघे गंभीर भाजले आहेत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कांबळे (वय ४०, रा. महात्मा फुले वसाहत) यांनी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येत होते. यावेळी परिसरातील ३०० ते ४०० नागरिक जमले होते. कैलास स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. शेवटचा अग्नी देत असताना अनिल शिंदे हे डिझेल टाकत होते. अचानक भडका उडाला. त्यांच्या हातातून कॅन सुटला व त्याचा स्फोट होऊन बाजूला उभे असलेले ११ जण भाजले गेले. त्यात मृत्यू पावलेल्यांची आई व मामेसासू यांचा समावेश आहे.
आशा प्रकाश कांबळे (वय ५९, रा. घोरपडी गाव), येणाबाई बाबू गाडे (वय ५०, रा. घोरपडीगाव), नीलेश विनोद कांबळे (वय ३५), शिवाजी बाबूराव सूर्यवंशी (वय ५५, रा. ताडीवाला रोड), वसंत बंडू कांबळे (वय ७४, चिंचवड), दिगंबर श्रीरंग पुजारी (वय ४०, रा. घोरपडीगाव), हरीश विठ्ठल शिंदे (वय ४०, रा हडपसर), आकाश अशोक कांबळे (रा. मुंढवा), शशिकांत कचरू कांबळे (वय ३६, रा. प्रायव्हेट रोड), अनिल बसन्ना शिंदे (वय ५३, रा. प्रायव्हेट रोड), अनिल नरसिंग घटवळ (रा. ताडीवाला रोड) अशी जखमींची नावे आहेत.
हेही वाचा
- Porn Video पाहताना ब्रिटनच्या खासदाराला महिला सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले
- राज ठाकरे म्हणजे नवहिंदू ओवेसी, संजय राऊतांची जहरी टीका
- डॉ.श्रीपाल सबनीस २९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी