राज ठाकरे म्हणजे नवहिंदू ओवेसी, संजय राऊतांची जहरी टीका | पुढारी

राज ठाकरे म्हणजे नवहिंदू ओवेसी, संजय राऊतांची जहरी टीका

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी ओवसी यांचा वापर केला. तसेच महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करीत असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात ते माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर लोकांना बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदयसम्राट म्हणून लोकांना माहिती आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, नकला केल्या तरी शेवटी हिंदू हृदयसम्राट हे एकच आहेत असे राऊत म्‍हणाले.

उद्या महाराष्ट्र दिन

सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले, ज्याप्रकारचे राजकारण सुरू आहे ती मात्र आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोक एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टिका केली होती. परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही.

भाजपने गेल्या 3 ते 4 वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.

हेही वाचा  

डॉ.श्रीपाल सबनीस २९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 

आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 

नंदुरबार : मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

Back to top button