ठाणे : पुढारी वृत्तसेवा : भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दाखल असलेल्या बलात्कार व रिव्हॉल्वर दाखवून महिलेस धमकवण्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी ठाणे न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर अंतरिम सुनावणी घेण्यात आली.
यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद लक्षात घेऊन आमदार नाईकांचा दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, नाईकांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ देण्यात यावा व सात दिवस अटक करू नये, अशी मागणी केली. मात्र, ही मागणी देखील न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे आमदार नाईकांवर अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात रिव्हॉल्वर दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा नवी मुंबईत दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात 21 एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता. ही सुनावणी ठाणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात होणार होती. मात्र, 27 एप्रिल रोजी अचानक ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली. यावेळी दोन्ही गुन्ह्यात नाईकांची पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी न्यायालयात सरकारी व फिर्यादीच्या वकिलांनी केली होती.
अत्याचार प्रकरणात संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे संशयित आरोपीची डीएनए टेस्ट करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली होती. तर डीएनए चाचणी करण्यास नाईक तयार असून त्यासाठी कस्टडीची गरज नाही असा युक्तिवाद नाईकांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बुधवारी (27 एप्रिल) केला होता. या गुन्ह्यातील सर्व आरोप निराधार असून महिलेच्या संमतीने संबंध ठेवण्यात आले होते, म्हणून त्यास बलात्कार मानू नये असा युक्तिवाद नाईकांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या युक्तिवादावर पीडित महिलेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. 2010 ते 2017 या काळात नाईक महिलेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करीत होते असे पीडितेच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले.
तक्रार मागे घ्यावी यासाठी सध्या फिर्यादीवर दबाव आणला जात असून दोन वेळा नातेवाईकांमार्फत त्यांना धमकी देण्यात आली आहे, त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. दोन्ही कडील युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी गुरुवारी अंतरिम सुनावणी देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. त्यानुसार गुरुवारी (28 एप्रिल) पुन्हा या प्रकरणी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही कडील वकिलांनी बरेच अतिरिक्त लेखी युक्तिवाद व अर्ज न्यायालयात सादर केले. त्यामुळे वेळे अभावी ही सुनावणी पुढे ढकलत 30 एप्रिल रोजी अर्जावर निर्णय देण्यार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी ठाणे न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.
यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद लक्षात घेऊन आमदार नाईकांचा दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यावेळी नाईकांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ देण्यात यावा व सात दिवस अटक करू नये अशी मागणी केली. ती मागणीही न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
हेही वाचा