पुणे : गुन्हे शाखेची पथके उदंड अन् कारवाई मात्र थंड! | पुढारी

पुणे : गुन्हे शाखेची पथके उदंड अन् कारवाई मात्र थंड!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखा हे शहर पोलिस दलाचे नाक असले तरी, काही पथके वगळता अनेक पथकांना कामगिरीचा सूर अद्याप देखील सापडला नसल्याचे दिसून येते. खरे तर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी गुन्हे शाखेची. मात्र अनेक पोलिस ठाण्याची कामगिरी पाहात गुन्हे शाखेचे काम म्हणावे तेवढे समाधानकारक नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके उदंड अन् कारवाई थंड असेच काहीसे चित्र आहे.

शहर गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुन्हे शाखेच्या कामाचा नुकताच आढावा घेतला. प्रत्येक पथकाने केलेल्या कामाची माहिती पीपीटीद्वारे घेतली. मात्र ती देखील अद्यावत नसल्याचे त्यांना आढळून आले. तसेच, युनिटच्या प्रभारी यांच्याकडून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून आले.

गुन्हे शाखेची कामगिरी गेल्या काही वर्षात ढेपाळलेली

शहरात मोबाईल चोरीचे व हिसकविण्याचे गुन्हे वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा सर्व प्रकार गंभीर आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पाठपुरवा करण्यात यावा. चोरीला गेलेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक मिळवून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढवा, अशा सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे गुन्हे शाखेची कामगिरी गेल्या काही वर्षात ढेपाळलेली दिसत आहे. त्यात गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी सर्व युनिटच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर गुन्हे शाखेची कामगिरी समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कामात सुधारणा करण्याबरोबरच अवैध कामे करणारे व त्यांना मदत करणार्‍या पोलिसांवर खात्यातंर्गत कारवाईच्या बडगाच्या इशारा देण्यात आला आहे.

शहरात घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरीचे गुन्हे सर्वाधिक होत आहेत. हे गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी एमओबीकडून माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणावे. यामध्ये सध्या गुन्हे शाखा कमी पडत आहे. या गुन्ह्यातील सराईतावर वचक ठेवण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नाकाबंदी, वाहनांची तपासणी करून गुन्हे उघडकीस आणावेत.

कारागृहातून सुटलेले सराईत व इतर आरोपींची माहिती घेऊन रात्र गस्तीवर असताना तपासणी करावी. तसेच, जबरी चोरी, घरफोडी, साखळी चोरी, वाहनचोरी अशा गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. त्याची माहिती वरिष्ठांना द्यावी. दिलेल्या काम वेळेत करावे.

तसेच, गंभीर गुन्ह्यांचा समांतर तपास करून त्वरित गुन्हे उघडकीस आणावेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकांनी दक्ष राहवे. गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेण्याच्या सूचना पोलिसांना द्यावात. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षाचे उमेदवारांना मदत करण्याच्या दृष्टीने गुन्हेगारीप्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करण्याची शक्यता असते. याबाबत गोपनीय माहिती घेऊन असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाईच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत.

कामात दिरंगाई अन् बेकायदा कृत्यावर नजर

गुन्हे शाखेत दाखल होताना काही कर्मचारी विशिष्ट हेतू ठेवूनच दाखल होतात. सद्यपरिस्थितीत देखली असे अनेक कर्मचारी गुन्हे शाखेत ठाण मांडून बसले आहेत. काही दिवस दुसर्‍या ठिकाणी कर्तव्य केले की परत त्यांना गुन्हे शाखेची मलमल खुनावू लागते. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांना खंडीत-अखंडीतचा नियम लागू होत नाही का असा सवालदेखील निर्माण होतो आहे.

गुन्हे शाखेतील एका कर्मचार्‍याने तर अवैध धंद्यावाल्यांच्या सोबत सहकारनगरीत हातमिळवणी करून आपले साम्राज्यच निर्माण केले आहे. यापुर्वी त्याच्यावर कारवाई करण्यास रोखले म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र तरी देखील मर्जीतील अधिकार्‍यासोबत रेटींगचे सेटींग करून त्याने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.

अशा बेजबाबदार कर्मचार्‍यावर ऐवढे वरिष्ठ मेहरबान का असा सवाल उपस्थित होतो आहे. त्यामुळे कामात दिरंगाई करतील, बेकायदा कृत्यात सहभागी होतील, अशा कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा पोलिस अंमलदारांना त्यांच्या युनिट प्रमुखांनी मार्गदर्शन करून कामात सुधारणा करण्यास सांगावे. त्यात सुधारणा होत नसेल तर त्यांचा गोपणीय अहवाल वरिष्ठांना सादर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

अवैध धंद्यावरील कारवाईवर तेवढ्यापुरतीच

शहरात क्रिकेट बेटींग, रेशनिंग काळाबाजार, विनापरवाना गुटखा अशी कामे करणार्‍यांची माहिती काढून कारवाई करावी. चोरीची वाहने घेणारे भंगार व्यवसायिक यांची ही माहिती काढून कारवाई करावी. खास करून वाघोली व चिखली परिसरात विशेष लक्ष द्यावे. सराईतांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर एमपीडीए, मकोका सारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. मात्र एकंदर गुन्हे शाखेने गेल्या काही महिन्यात केलेली कामागिरी असमाधनकारक आहे.

हेही वाचा

Back to top button