विधानसभेत शिवजयंतीवरून रंगला वाद | पुढारी

विधानसभेत शिवजयंतीवरून रंगला वाद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार या विषयावरून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा वाद नको, असे सांगत मुनगंटीवार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

राज्यात भाजपचे पाच वर्षे सरकार असताना कधीही तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली नाही. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपला सुनावले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले आहेत.

मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेना, भाजपच्या काही आमदारांनी देखील महाराजांना वंदन केले. जयंतीच्या दिवशी जे महामानव आहेत त्यांचे फोटो विधानभवनात ठेवले जातात आणि सदस्य त्यांना पुष्प अर्पण करतात अशी प्रथा आहे. पण या राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?,’ असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

या मुद्द्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, हे सरकार येण्याआधी अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी काम केले आहे. मी देखील पाच वर्षे सभागृहात येत होतो पण तेव्हा कधीही तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली नाही. मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे एका खात्याचे मंत्री होते. त्यांनी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला हे रेकॉर्डवर आणले. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवरायांचा जन्म जेथे झाला त्या शिवनेरीवर जाऊन अभिवादन करुन जयंती साजरी करतात. ही परंपरा कायम असून सर्व मुख्यमंत्र्यांनी ती कायम ठेवली आहे,’ असे अजित पवार म्हणाले.

उन्हात जाऊन अभिवादन करण्यास त्रास होतो का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तव्यालाही तितकेच महत्त्व दिले याची आठवण ठेवा. आज सुट्टी नसून काम सुरु आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुनगंटीवार यांनी मागे एखादी गोष्ट केली नाही, म्हणून भविष्यात करता येत नाही का? असा सवाल विचारला असता पवार म्हणाले, आपल्या प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे. तेथे जाऊन अभिवादन करा ना. उन्हात जाऊन अभिवादन करायला काही त्रास होतो का?

Back to top button