LPG Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला | पुढारी

LPG Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल- डिझेल दर वाढीसोबतच गॅस सिलिंडर दरवाढीचा (LPG Cylinder Price) फटका बसलाय. घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर (Domestic cooking gas LPG price) तब्बल ५० रुपयांनी महागलाय. यामुळे आता ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी ९४९.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

एलपीजीचे दर याआधी ६ ऑक्टोबर रोजी वाढविण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे. ५ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता ३४९ रुपये असेल. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २००३.५० रुपये आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात ८५ पैशाने वाढ

पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दि. २२ मार्च आज मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर दरात ८५ पैशांनी वाढ केली आहे. ही वाढ १३७ दिवसानंतर झाली आहे. यामुळे आता पेट्रोल ११० रूपये १४ पैसे लिटर वरून ११० रूपये ९९ पैशांवर पोहोचले तर डिझेल ९४ रूपये ३० पैशांवरून ९५ रूपये १६ पैशांवर आले.

ही दरवाढ पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर होणार होती. अशी माहिती पेट्रोल पंपचालक यांनी दिली होती. मार्चमध्ये निवडणूकांचे निकाल लागताच अवघ्या आठवडा पुर्ण होताच केंद्राने ही इंधन दरवाढ केली. यामुळे आता पुन्हा एकदा वाहतुकदारांकडून गाडी भाड्यात वाढ होईल. याचा फटका महागाईला बसणार आहे. यामुळे सहाजिकच परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीवर होऊन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे.

आतापर्यंत झालेल्या इंधन दरवाढीने भाजीपाला, अन्नधान्याच्या दरात किरकोळ बाजारात वाढ झाली होती. ही दरवाढ केवळ इंधन दरवाढीने होत असल्याची माहिती किरकोळ व्यापारी, वाहतुकदारांकडून दिली जाते. याचा परिणाम आणखी रिक्षा भाड्यावर होण्याची दाट शक्यता आहे. लांब पल्याच्या लक्झरी भाड्यातही काही अंशी वाढ होण्याचे संकेत आहे.

Back to top button