उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंची मालमत्ता विचारली: एकनाथ शिंदे | पुढारी

उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंची मालमत्ता विचारली: एकनाथ शिंदे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची प्रसिद्धी उद्धव ठाकरे यांच्या नजरेत खुपत होती. त्यामुळे आनंद दिघे यांचे जिल्हा प्रमुख पद काढण्याचे कारस्थान आखण्यात आले होते. त्यांच्या जागी पर्याय देण्याचे कामही सुरु होते, दिघे यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच धर्मवीर चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखविल्या नव्हत्या. परंतु, आता पुढच्या भागात सगळे खरे दाखविणार, असेही ते म्हणाले.

ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज (दि,६) टीप टॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ठाणे आणि पालघर जिल्हा हा एकच होता. त्याचे नेतृत्व आनंद दिघे करत होते. त्यांना मातोश्रीने पद आणि जिल्हा सोडायला सांगितले होते. परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर, आपल्यासोबत एकही माणूस राहणार नाही, असे अनेकांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला, असेही ते म्हणाले.

दिघे हे फकीर माणूस होते, दोन्ही हाताने वाटणारे होते आणि शाखेत राहत होते. पण दिघे यांच्या निधनानंतर ठाकरे यांनी मला त्यांची मालमत्ता विचारली. तेव्हाच आपण चुकीच्या ठिकाणी असल्याची जाणीव झाल्याचे ते म्हणाले. परंतु नाईलाजाने काम करत होतो, असेही ते म्हणाले. दिघे यांची लोकप्रियता सलत होती. यामुळेच त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता आणि रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आला होता. दिघे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून राज ठाकरे यांचे नाव पुढे केले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही.

सिनेमात जे काही दाखवले राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी पद दिले हे खोटे आहे. दुसऱ्या पार्टमध्ये सिनेमात ते खरे दाखवणार आहे. राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला परंतु त्यांनी दिला नाही. राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले. तेव्हा मोरे समजूतदार होते. त्यांनी म्हटले, दिघेंनी जो निर्णय घेतला तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तु बिल्कुल काही बोलू नको, असे त्यांनी सांगितले. राजन विचारे दिघेंना खूप काही बोलले. त्यानंतर आनंद आश्रमात दिघे यांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावले. विचारे हे दिघे यांचे नकली शिष्य आहेत.

राजन विचारेंनी दिघेंना शिव्या शाप दिले

दिघे यांचा नवरात्र उत्सव, हंडी सुरु असतानाही टेंभी नाक्यापासून हाकेच अंतरावर विचारे यांनी देवी आणि हंडी उत्सव सुरु केला. दिघे यांच्या नावाने ट्रस्ट तयार केला होता. परंतु, तो रद्द करण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले. दिघे यांचे नाव हिरानंदानी मेडोज येथील नाट्यगृहाला देण्याचा ठराव झाला होता. परंतु त्यांचे नाव दिले जाऊ नये, असेही ठाकरे यांनी सांगितले.

नरेश म्हस्केंना कानपिचक्या

खासदार झाल्यावर नगरसेवक, आमदार यांच्या कोणत्याही कामात आडकाठी करायची नाही. महापालिकेत लक्ष घालायचे नाही, खासदार होऊन दिल्लीत काम करायचे, खासदार झाल्यावर फोन बंद ठेवायचा नाही. आता बदलणार नाही, तर बदलावे लागले, अशा कानपिचक्याही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हस्के यांना दिल्या.

नगरसेवकांना इशारा

ही निवडणुक खूप महत्वाची आहे. त्यामुळे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या उमेदवाराला आपआपल्या भागातून लीड द्यायला हवा. लीड दिला नाही, तर मात्र तुम्हालाही तिकीट द्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button