कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी 26 कोटी | पुढारी

कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी 26 कोटी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्त 64 एकरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी आणखी 26 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवारी नियोजन विभागाने हा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग केला. विमानतळाचे विस्तारीकरण सुरू आहे. सध्याची धावपट्टी 2 हजार 300 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी 64 एकरच्या अतिरिक्त भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

थेट खरेदी प्रक्रियेद्वारे या जागेचे संपादन केले जाणार आहे. विमानतळ भूसंपादनासाठी 300 कोटींची मूळ अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापैकी 180 कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यापैकी 9 मे 2018 रोजी 5.81 हेक्टर आर. इतक्या जमीन संपादनासाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

यानंतर 10.93 हेक्टर आर. जमिनीच्या निर्वनीकरणासाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 53 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 27 कोटी रुपये यापूर्वी उपलब्ध करून दिले आहेत, उर्वरित 26 कोटींचा निधी सोमवारी देण्यात आला. यामुळे भूसंपादनाला गती येणार आहे.

Back to top button