पुणे : तरसच्या हल्ल्यात कुत्रा, शेळ्या धावल्या मालकाच्या मदतीला | पुढारी

पुणे : तरसच्या हल्ल्यात कुत्रा, शेळ्या धावल्या मालकाच्या मदतीला

मंचर : पुढारी वृत्तसेवा: मेंगडेवाडी-गवारीमळा येथे तरस या प्राण्याने आपल्या वृद्ध मालकावर हल्ला केल्याचे पाहुन अखेर शेवटी मालकाच्या मदतीस त्यांचे पाळीव कुत्रे आणि शेळ्या आल्या. शेळ्या आणि कुत्र्यांने तरस प्राण्याला ठार केल्याची घटना शनिवारी (दि. २९) दुपारी घडली. तरसाच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेले शेतकरी विश्वनाथ बापु गवारी (वय ८५) यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गवारीमळा येथील शेतकरी विश्वनाथ बापु गवारी हे आपल्या पाळीव शेळ्या डोंगरच्या पायथ्याशी चारण्यासाठी कुत्र्यासह घेवुन गेले होते. चारा खाल्ल्यानंतर शेळ्या उजव्या कालव्यात साचलेले पाणी पिण्यासाठी कालव्यात उतरल्या. त्यावेळी शेतकरी विश्वनाथ बापु गवारी हे शेळ्यांलगत बसले. त्याचवेळी अचानक आलेल्या हिंस्त्र प्राण्याने काही कळण्याच्या आतच शेतकरी विश्वनाथ गवारी यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. हिंस्त्र प्राणी आणि वृद्ध शेतकऱ्याची सुमारे तासभर झटापट झाली.

हिंस्त्र प्राण्याने विश्वनाथ बापु गवारी यांचा उजव्या हाताचा पंजा, दोन्ही हाताचा कोपरा, डाव्या पायाच्या पोटऱ्यानजीक आणि उजव्या कानाच्या पाळीवर हल्ला केला. आपला मालकांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे पाहून त्यांचे पाळीव कुत्रे, तीन शेळ्या गवारी यांच्या मदतीस धावून गेल्या. शेळ्यांचा रुद्रावतार आणि त्यांची शिंगे तसेच कुत्र्याने हिंस्त्र प्राण्यावर जोरदार हल्ला केला. त्यामध्ये हिंस्त्र प्राणी जागीच ठार झाला, तर वृद्ध शेतकरी जखमी झाला.

याच दरम्यान विश्वनाथ बापु गवारी यांची आरडाओरड ऐकून आजुबाजुस काम करत असलेले शेतकरी मदतीसाठी आले. जखमी अवस्थेत त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. केवळ शेळ्या आणि कुत्र्यामुळे आपला जीव वाचल्याची प्रतिक्रिया जखमी शेतकरी विश्वनाथ गवारी यांनी दिली. शेतकऱ्यांनी हिंस्त्र प्राण्याची बारकाईने पाहणी केली असता हा प्राणी तरस असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button