Karnataka : कर्नाटकात नाईट कर्फ्यू मागे; महाराष्ट्रातून येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह अहवालाची सक्ती कायम | पुढारी

Karnataka : कर्नाटकात नाईट कर्फ्यू मागे; महाराष्ट्रातून येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह अहवालाची सक्ती कायम

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात (Karnataka) कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी पासून नाईट कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. तसेच बंगळूरमधील सर्व शाळांना सोमवारपासून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकात ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढल्यानंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते. हॉटेल, पब मध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्केच लोकांना प्रवेश असेल, असेही निर्बंध लावण्यात आले आहेत.

कर्नाटकात (Karnataka) सध्या २.८८ लाख ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील ५,४७७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २८ जानेवारीपर्यंत रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण १.९० टक्के एवढे आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी दिली आहे.

गोवा, केरळ आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांतून कर्नाटकात येणाऱ्या लोकांसाठी RT-PCR निगेटिव्ह अहवाल सक्तीचा नियम कायम ठेवण्यात आला आहे. तसेच राज्यातील धार्मिक यात्रा, निदर्शने आणि रॅलींवरही बंदी कायम ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

५० टक्के क्षमतेसह जीम सुरू राहतील. बार, हॉटेल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी कार्यालये १०० टक्के क्षमतेने काम करतील. मंदिरांमध्ये दर्शनासाठी परवानगी आहे. निदर्शने, धरणे, धार्मिक सभा, राजकीय कार्यक्रमांना प्रतिबंध असेल, अशी माहिती कर्नाटकचे मंत्री बीसी नागेश यांनी दिली आहे.

सभागृहात होणाऱ्या लग्न समारंभांना २०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तर आउटडोअर होणाऱ्या लग्न समारंभांना ३०० लोक उपस्थित राहू शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Back to top button