mumbai municipal : मुंबई महापालिकेच्या ओबीसी जागा खुल्या प्रभागात समाविष्ट होणार? | पुढारी

mumbai municipal : मुंबई महापालिकेच्या ओबीसी जागा खुल्या प्रभागात समाविष्ट होणार?

मुंबई : पुढारी वृतसेवा : मुंबई महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रभाग पुनर्रचनेच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. आराखडा हरकती-सूचना मागवण्यासाठी पुन्हा मुंबई महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गातील समाविष्ट केल्या जाण्याची शक्यता आहे. (mumbai municipal)

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेने प्रभाग पुनर्रचना केली होती. त्याचा कच्चा आराखडाही तयार झाला होता. मात्र ९ प्रभाग वाढल्यामुळे प्रभागांची पुन्हा पुनर्रचना करण्यात आली. याचा कच्चा आराखडा महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्य निवडणूक आयोगाने हा प्रारूप आराखडा ओबीसी आरक्षण वगळून हरकती व सूचनांसाठी पाठवला आहे.

यावर मुंबई महानगरपालिका हरकती सूचना मागवणार असून यासाठी 15 दिवसाचा वेळ देणार आहे. त्यानंतर पक्का आराखडा तयार करून, तो पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 प्रभाग असणार आहेत. या संदर्भातील प्रारुप आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिली आहे.

प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता व निवडणूक प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रमासंदर्भात  राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आला  नसल्‍याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

mumbai municipal : आराखड्यानुसार 236 प्रभागाचे आरक्षण असे असेल

खुला प्रवर्ग – 219

एससी -15

एसटी – 2

महिला जागा

खुला प्रवर्ग – 118
एससी – 8
एसटी – 1

हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम नेमका कसा असणार ? 

1 फेब्रुवारी

निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे

1 ते 14 फेब्रुवारी

आराखड्यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी

16 फेब्रुवारी

प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे

26 फेब्रुवारी

राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक

2 मार्च

सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवणे

समान प्रभाग वाढणार

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान 3 प्रभाग वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरभागात लोअर परळ, वरळी आदी ठिकाणी नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्यामुळे येथे नवे प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरामध्ये मानखुर्द, संघर्षनगर, माहूल पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात प्रभाग वाढवले जाण्याची शक्यता आहे.

Back to top button