स्थानिक माठ कारागिरांच्या धगधगत्या आव्याला घरघर; परप्रांतीय बनावटीच्या माठांना पसंती | पुढारी

स्थानिक माठ कारागिरांच्या धगधगत्या आव्याला घरघर; परप्रांतीय बनावटीच्या माठांना पसंती

खानिवडे : विश्वनाथ कुडू :  सध्या उन्हाळा वाढू लागल्याने थंडगार पाण्यासाठी मातीच्या माठांची मागणी वाढू लागली आहे. मात्र स्थानिक माठ कारागिरांपेक्षा परप्रांतीय बनावटीचे माठ वसईच्या घराघरात विक्रीसाठी येत असल्यामुळे येथील स्थानिक माठ कारागिरांच्या धगधगत्या आव्याला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या 

मार्च सुरू होताच उकाड्याची सुरुवात झाल्यानंतर पुन्हा काही दिवस बदलत्या वातावरणामुळे गारवा वाढलेल्या वसईत आता मार्चच्या मध्यावर पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे आपसूक नागरिक थंड पाण्याकडे वळले आहेत. यामध्ये सर्वात सहज सोपा विना इंधनाने पाणी शीतल करण्याचे साधन म्हणजेच मातीचे माठ असल्याने आता त्यांची मागणी वाढू लागली आहे. यामुळे आता माठ विक्री करणारे वसई तालुक्यातील शहरांसह गावांच्या गल्लीबोळात दिसू लागले आहेत. मात्र हे विक्रेते राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या परप्रांतात माठ विकत असल्याचे दिसून येत आहे.

विक्रीसाठी आलेले माठांमध्ये छोटा माठ 150 ते 200 तर सर्वात मोठा माठ हा 350 ते 400 रुपयांमध्ये मिळतो. मात्र हे माठ आपल्याकडे मिळणार्‍या पारंपरिक कारागिरांच्या माठापेक्षा कमी जाडीचे, हलके आणि लवकर तडा जाणारे असून आकर्षक करण्याच्या प्रक्रियेमुळे कमी झिरपत असल्याने पाण्याला कमी शीतलता देणारे ठरतात. त्यामानाने स्थानिक कारागीरांनी बनवलेले, आव्यात भाजलेले माठ हे योग्य जाडीचे, चांगले झिरपत असल्याने अत्यंत शीतल पाणी देणारे ठरतात.

जर संध्याकाळी माठ भरले तर दुसर्‍या दिवशी अगदी आल्हाददायक शीतल पाणी मिळते. मात्र आता माती कारागीर व्यवसाय, नोकरी धंद्यात गुंतून गेल्याने उरली सुरली जुनी पिढी जेमतेम हा व्यवसाय करत असल्याने आता कुंभारवाड्यातील आव्याची धग अखेरीस आल्याचे सांगण्यात येत आहे. तर वसईत वाढत्या नागरिकीकरणामुळे चांगली माती, लाकूड फाटा मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंदच केला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांवर दिलासादायक शीतल व गारेगार पाण्यासाठी नागरिक मातीच्या माठांना पसंती देत आहेत, मात्र स्वस्त व दारावर मिळणार्‍या राजस्थानी माठांमुळे स्थानिक कारागिरांचा व्यवसाय डबघाईस आल्याचे दिसून येत आहे.

परप्रांतीय माठांत तफावत

मागील काही वर्षांपासून परप्रांतातील तयार व तुलनेत स्वस्त माठ बाजारात दाखल झाले असून अगदी कुठल्याही भटकंतीशिवाय गृहिणीला ते दारावरही मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक माती कारागिरांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. 100 ते 400 रुपयांना नळासह राजस्थानी माठ मिळत असले तरी त्यांच्या बनावटीत व स्थानिक माठ बनावटीत मोठे अंतर असून राजस्थानी माठाला वापरण्यात येणार्‍या मातीला कमी रुंदी असूनही झिरपा कमी असल्याने पाण्याचे गारेगारपण हवे तेेवढे मिळत नाही.

पारंपरिक व्यवसाय वाचविण्याची मागणी

स्थानिक कारागिरांनी बनविलेल्या माठाची जाडी, योग्य उष्णतेने भाजलेली भाजण व भाट माती असल्याने कितीही उन्हाचा दाह असला तरी मोठा झिरपा उत्पन्न होत असल्याने आतील पाणी हे चांगलेच गार असते. मात्र माती,आवा भाजणीसाठी लागणारे सरपण, मजुरी, आदीमुळे वाढीव किंमतीमुळे माठ थोडेे महाग विकावे लागतात. नागरिकांनी ही बाब लक्ष्यात घेऊन माठ खरेदी करावेत व पारंपरिक व्यवसाय वाचवावा अशी विनंती केली जात आहे.

Back to top button