सहा वाहने चोरणारे तीन चोरटे अटकेत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सहा वाहने चोरणारे तीन चोरटे अटकेत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघर : पुढारी वृत्तसेवा ;  वसई-विरार, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाणे अंतर्गत सहा वाहनांची चोरी करणार्‍या तीन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित बातम्या

मोटरसायकल व रिक्षा चोरणार्‍या तीन आरोपींना पोलिसांनी शोध मोहीम राबवून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकल व एक रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला. वालीव, तुळींज पोलीस ठाण्यांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासचक्र फिरवून चार पोलीस ठाण्यांतर्गतचे हे गुन्हे उकल केले.

वसई पूर्व भागात नाईक पाडा भागात अन्वर कुरुष यांची पार्क केलेली मोटार सायकल अज्ञाताने 9 मार्च रोजी चोरून नेली होती. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. आयुक्तालय क्षेत्रात मोटरसायकल चोरांचा सुळसुळाट वाढल्याची बाब गांभीर्याने घेत परिमंडळ दोनच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी या प्रकरणात विविध शोध पथके स्थापन करून तपासाचे आदेश दिले.

तुळींज विभागाचे पोलीस सहायक उप आयुक्त उमेश माने-पाटील, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस अधिकारी सचिन सानप यांच्या विविध पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी रोहित सिंग व अनिल कपूर सिंग, तर मोहन सिंग यांना ताब्यात घेतले. त्यांनी पाच मोटारसायकल व एक रिक्षा चोरल्याची कबुली दिली. गुन्ह्यांची उकल केलेल्या पथकात पोलीस निरीक्षक जिलानी सय्यद यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. सचिन सानप, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी आदींचा सहभाग होता.

Back to top button