पालघर : मोरवाड्यातील धरणे ठरतायेत बिनकामाची | पुढारी

पालघर : मोरवाड्यातील धरणे ठरतायेत बिनकामाची

मोखाडा; हनिफ शेख : पालघर जिल्ह्यातील निर्माण झालेली धरणे त्याचा उपयोग आणि पुनर्वसन अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिजाऊ संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने या धरणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यानिमित्ताने खरच गंभीर मुद्दा असलेल्या मोखाडा तालुक्यातील धरणांचाही बांधण्याचा उद्देश, आजवर झालेला फायदा याचा अभ्यास केल्यास यासर्वांचे उत्तर शून्य येईल अशी स्थिती आहे. कारण २० वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या धरणांच्या कालव्याचे काम आजही सुरू असेलेले काम पूर्ण होण्याआधीच गळती लागलेली असेल तर या धरणाचा नेमका फायदा कोणाला झाला या प्रश्नाचे उत्तर आजही मिळत नाही. यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने या धरणांचा सोक्षमोक्ष लागायला हवा आणि या धरणावर माजलेल्या भ्रष्टाचाराच्या गवतांची कापणी व्हायला हवी, अशी मागणी याभागातील जनता आता करताना दिसत आहे.

जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व धरणांच्या विषयांवर मोठे आंदोलन होत आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात मोखाडा तालुक्यातील धरणांचाही उल्लेख आहे यामुळे तालुक्यातील बिनकामाच्या धरणांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तालुक्यातील तुळ्याचापाडा, पळसपाडा (वाघ प्रकल्प) खोच धरण, सायदे धरण, तसेच मध्यवैतरणा प्रकल्पही या सर्व धरणांच्या निर्मितीला आज १० ते काहिना २० वर्षे झाली आहेत. तुळ्याचापाडा धरण सिंचनासाठी कि नेमके कशासाठी अशी स्थिती आहे. कारण कालव्यातून पाणी सुटत नाही, धरणगळतीमुळे आसपासची शेती बारमाही पाण्याखाली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केवळ काही प्रयोगशील शेतकरी या पाण्याचा उपयोग तेही स्वखर्चाने करीत आहे तर दुसरे धरण पळसपाडा याठीकाणी वाघ प्रकल्प हाती घेऊन आज २० वर्ष होत आली तरीही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचलेच नाही. उलट धरणाला गळती आणि कालव्यालाही गळती लागल्याने हा प्रकल्प पुर्ण व्हायच्या आतच गळती लागलेला आहे. मात्र तरीही दरवर्षी या कालव्यांच्या आणि धरणाच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याने आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातयं अशी स्थिती झाली आहे.

याबरोबरच सायदे धरणाचीतर परीस्थिती अतिशय भयंकर असून या धरणाकडे पाहून खऱ्या अर्थाने सिंचन घोटाळा काय असेल याची प्रचीती येते. भर उन्हाळ्यात दुरुस्तीच्या नावाखाली या धरणाचे पाणी सोडून देण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांची पिके तसेच मोगराशेती धोक्यात आली आहेत. मात्र कधीतरी येवून एखाद दुसरा नट बदलण्याशिवाय कसलीही काम होताना दिसत नसल्याचे येथील स्थानिक सांगतात अशी स्थिती खोच धरणाची झाली आहे. फक्त पर्यटनस्थळ म्हणूनच या धरणाचा उपयोग होत असून शालेय सहली आणि पार्टीसाठी हक्काचे ठिकाण एवढाच या धरणाचा उपयोग आहे. यानंतर १२० किमी मध्य वैतरणा धरणाचे पाणी नेणाऱ्या शासनाला कोचाळे कारेगांव कडुचीवाडी येथील लोकांना पाणी देता येत नाही, त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना १० दिवसांपेक्षा अधिक दिवस चालत नाही तसेच पुर्नवसनाचा विषयही अद्यापर्यंत प्रलंबितच आहे. यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी स्थिती असताना या धरणांचा खरा फायदा यासंबंधित अधिकारी आणि ठेकेदाराना मिळत असल्याचे चित्र आहे.

मी स्वतः या सर्व धरणांचा मुद्दा शासनदरबारी वेळोवेळी मांडत आहे. सायदे धरणासाठी तर असंख्यवेळा पत्रव्यवहार केला आहे मात्र मुजोर प्रशासन दादच देत नाही. कारेगांव ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याचा प्रश्नही प्रलंबितच आहे, याशिवाय चास गोमघर धामणशेत पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी खर्च होवूनही ग्रामपंचायतींनी त्या ताब्यात घेतलेल्या नाहीत यामुळे या सर्वांवर जर तोडगा निघाला नाही तर मी आठवड्याच्या आत उपोषण करणार आहे.
– प्रदीप वाघ, उपसभापती, पं. स. मोखाडा

Back to top button