छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना एका लष्करी जवानाने चक्क ईव्हीएम मशीन हॅक करण्याची ऑफर देत अडीच कोटींची मागणी केली. दानवेंना त्याची भामटेगिरी लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनीही त्याला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. 7 मे रोजी बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली.
मारोती नाथा ढाकणे (42, रा. काटेवाडी, पो. खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून तो उदमपूर (जम्मू) येथे लष्करात हवालदार म्हणून कार्यरत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात मारोती ढाकणे नावाचा व्यक्ती फोन करून ईव्हीएम मशीनमध्ये एक चीप बसवून तुमच्याच उमेदवाराला जास्त मतदान करून देतो, असे सांगून अडीच कोटी रुपयांची मागणी करीत असल्याचे म्हटले होते.