यंदाचा एप्रिल ठरला आजवरचा सर्वात उष्‍ण महिना! हवामान बदलामुळे ३८ लाख कोटी रुपयांच्‍या नुकसानीची भीती | पुढारी

यंदाचा एप्रिल ठरला आजवरचा सर्वात उष्‍ण महिना! हवामान बदलामुळे ३८ लाख कोटी रुपयांच्‍या नुकसानीची भीती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाचा एप्रिल (२०२४) महिना आतापर्यंतचा सर्वात उष्‍ण महिना ठरला आहे, असे युरोपमधील हवामानाचा अभ्‍यास करणारी संस्‍था कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने म्हटले आहे. एप्रिल 2024 मध्ये जगातील काही देशांनी प्रचंड उष्णता अनुभवली. तर याच काळात जगभरातील काी देशांमध्‍ये पूर, ओला दुष्काळ अशा आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. स एल निनो प्रभाव आणि हवामान बदलामुळे तापमानात वाढ असल्‍याने या संस्‍थेने आपल्‍या अहवालात म्‍हटलं आहे.

२०१६ मधील सर्वाधिक तापमानाचा विक्रम २०२४ एप्रिलने मोडला

‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’च्‍या अहवालानुसार, एप्रिलमध्ये सरासरी तापमान वाढले. जे 1850-1900 च्या पूर्व-औद्योगिक काळातील तापमानापेक्षा 1.58 अंश सेल्सिअस अधिक नाेंदले गेले आहे. तर 1991-2020 च्या तुलनेत एप्रिल 2024 चे सरासरी तापमान 0.67 अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी एप्रिल 2016 मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती, मात्र एप्रिल 2024 मध्येही तो विक्रमही मोडला आहे.

एल निनोचा प्रभाव

कोपर्निकस क्लायमेट एजन्सीचे संचालक कार्लो बुओनोटेम्पो यांनी सांगितले की, एल निनोचा प्रभाव या वर्षाच्या सुरुवातीला शिखरावर पोहोचला होता, परंतु आता पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीकडे जात आहे, तरीही समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अजूनही वाढत आहे एप्रिल 2024 मध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाल्याचे मानले जाते.

जागतिक तापमान गेल्या 12 महिन्यांतील सर्वाधिक नोंदवले गेले आहे. औद्योगिक कालावधी (1850-1900) पूर्वीच्या तुलनेत 1.61 अंश सेल्सिअस जास्त आहे. जगभरातील देशांनी सरासरी जागतिक तापमान वाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

वार्षिक 38 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती

जर्मनीच्या पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अर्थव्‍यवस्‍थेला बसण्‍याची शक्‍यता आहे. हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 2049 पर्यंत दरवर्षी सुमारे 38 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते. विशेष म्‍हणजे जे देश हवामान बदलासाठी जबाबदार नाहीत त्यांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

आशियाई देश उष्‍णतेच्‍या लाटेने होरपळले

आशियाई देशांना सध्या उष्णतेच्या लाटेची समस्या भेडसावत असून फिलीपिन्समधील शाळाही बंद ठेवाव्या लागल्या. मागील एक महिना भारतातील विविध राज्‍ये प्राणघातक उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. तर दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीमध्ये 75 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने स्‍पष्‍ट केले आहे की, आता ला निना प्रभाव निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात चांगला पाऊस अपेक्षित आहे.

हेही वाचा :

Back to top button