नाशिक : अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान | पुढारी

नाशिक : अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेरसह परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचीही तारांबळ उडाली. दुपारी सव्वाचार वाजता अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे लागवड केलेला शेतकऱ्यांचा कांदा, रोपे व खुडलेला मका पावसात भिजला. तसेच अचानक आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला सोयाबीन, मका, ओला झाल्यामुळे व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांनी महागडी कांदा रोपे बियाणे खरेदी करून रोपणी केली मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यात अचानक झालेल्या पावसामुळे कांदा रोपणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन सुरु आहे. शेतकऱ्यांनी आपली शेती मशागतीसाठी तयार करण्याचे काम सुरू केले आहे, तर काही शेतकरी हे शेतात असलेला मका काढण्याचे काम करताना दिसत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे सुकापूर येथे गारपीट झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळनेरसह परिसरात रब्बी पिके धोक्यात…

पिंपळनेर सामोडे, झंझाळे, देशशिरवाडे, बोधगाव, चिंचपाडासह परिसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून, दिड तास चाललेल्या या बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. रब्बी हंगामाला याचा मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कालच्या पावसाने कांदा, गहू, हरभरा व मसूर तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे. काल आठवडे बाजार असल्याने या पावसामुळे व्यापारी व नागरिकांची खूपच तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांनी गोदामासमोरच्या उघड्या जागेवर ठेवलेला माल ओला झाला आहे. एकूणच शेतकरी व व्यापारी यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. गारठा वाढल्याने वातावरणीय बदलाने साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वाढली आहे.

“खरीप हंगामात उत्पन्न न मिळाल्याने याची कसर रब्बी हंगामात निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दादर, गहू, हरभरा, मका यांची पेरणी केली होती, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे होत्याचे नव्हते झाले. रब्बी पिकाचे येणारे पीक देखील हातातून गेले असून याबाबत त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी.

भरत सूर्यवंशी; शेतकरी पिंपळनेर

Back to top button