

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लीजंड लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) सहभागी होणार नाही. सचिनची कंपनी एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. यासोबतच आयोजक आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी क्रिकेटप्रेमींमध्ये चुकीची माहिती पसरवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. तथापि, खोटी माहिती पसरवल्याबद्दल कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही आणि सचिनच्या कंपनीकडून तो या लीगमध्ये सामील होत असल्याचा केवळ इन्कार करण्यात आला आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) चुकीचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर 'बिग बी' अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी माफी मागितली आहे. अमिताभ यांनी ते ट्विट आणि व्हिडिओ डिलीटही केला आहे. यानंतर त्यांनी लीजंड क्रिकेट लीगची एक नवीन व्हिडिओ क्लिपही शेअर केली.
बॉलिवूडचे शेहनशाह बच्चन (Amitabh Bacchan) यांनी शनिवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) लीजंड क्रिकेट लीगमध्ये (Legends League Cricket) खेळणार असल्याचा उल्लेख केला. मात्र, एसआरटी कंपनीच्या व्यवस्थापनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. सचिन तेंडूलकर या लीगचा भाग असणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. एसआरटी ही कंपनी सचिन तेंडूलकर यांच्या मालकीची आहे. कंपनीने अमिताभ बच्चन यांना त्यांची चूक दाखवून दिली. त्यानंतर बच्चन यांच्या ती चूक लक्षात आली आणि त्यांनी व्हिडिओ डिलीट करून आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली.
अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसाठी एका जाहिरात केली. ज्यात ते सांगतात की, कोणते दिग्गज क्रिकेटपटू लीजंड लीग क्रिकेटमध्ये सामील होत आहेत. यामध्ये ते अगदी सुरुवातीला सचिन तेंडुलकरचे नाव घेतात. हा व्हिडिओ पुन्हा शेअर करताना सचिनच्या (Sachin Tendulkar) कंपनीने सचिन या लीगमध्ये खेळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
लीजंड लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, आशिया आणि उर्वरित जगातील तीन संघ सहभागी होणार आहेत. २०२२ हे वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी एक भेट घेऊन आले आहे. माजी भारतीय क्रिकेट दिग्गज वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लीजंड लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत तो भारत महाराजा संघाकडून खेळणार आहे. लीजंड लीग क्रिकेट ही निवृत्त क्रिकेटपटूंची व्यावसायिक लीग आहे. यामध्ये तीन संघ सहभागी होणार आहेत. भारत महाराजा संघाव्यतिरिक्त आशिया आणि उर्वरित जगातील आणखी दोन संघ आहेत.
भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, आरपी सिंह, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी हे या स्पर्धेत खेळणार आहेत. संजय बांगरची नुकतीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर इरफान सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कॉमेंट्री करत आहे.